मुंबई : भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. विक्रमांच्या राशी रचणाऱ्या या महान खेळाडूकडून कायम नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण बुधवार १ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
वानखेडे स्टेडियमच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये होणाऱ्या या सोहळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते या पुतळय़ाचे अनावरण होईल.या सोहळय़ासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष आशीष शेलार आदी उपस्थित असतील. या सोहळय़ासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वत: उपस्थित राहणार आहे. सचिन आणि वानखेडे यांचे नाते वादातीत आहे. या स्टेडियमवर त्यांनी धावांच्या राशी उभारल्या आहेत. भारताने २०११ मध्ये याच ठिकाणी विश्वचषक उंचावला. त्यामुळे सचिनच्या पुतळय़ासाठी यापेक्षा चांगली जागा कोणती असेल, अशी प्रतिक्रिया मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली.