Steve Smith hits second century in ICC Knockouts: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत डब्ल्यूटीसीचा फायनल सामना ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने विक्रमी शतक झळकावत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. त्याने या शतकाच्या जोरावर अनेक विक्रम मोडले. त्याचबरोबर त्याने रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी केली.

भारताविरुद्ध शतक झळकावून स्मिथने रोहित शर्मा, शेन वॉटसन आणि महेला जयवर्धने यांसारख्या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली. स्मिथचे आयसीसी बाद फेरीतील दुसरे शतक ठरले. या खेळीनंतर स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावाही पूर्ण केल्या. स्मिथचे हे भारताविरुद्धचे १४ वे आंतरराष्ट्रीय शतक होते आणि त्याने रिकी पाँटिंगची (१४ शतके) बरोबरी केली. स्मिथने आतापर्यंत कसोटीत ९ तर भारताविरुद्ध वनडेत ५ शतके झळकावली आहेत.

स्टीव्ह स्मिथने रोहित शर्मासह अनेक दिग्गजांच्या विक्रमाशी केली बरोबरी –

स्मिथने आयसीसी बाद फेरीतील आपले दुसरे शतक झळकावले. यापूर्वी २०१५ मध्ये त्याने एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध १०५ धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या डावात त्याने २६८ चेंडूंचा सामना केला आणि १९ चौकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs AUS: स्टीव्ह स्मिथ की विराट कोहली, कसोटी क्रिकेटमध्ये कोण आहे सर्वोत्तम? पाहा दोघांची आकडेवारी

स्मिथ आता आयसीसी बाद फेरीत (नॉकआउट) दोन शतके झळकावणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा, शेन वॉटसन आणि महेला जयवर्धने यांनी अशी कामगिरी केली आहे. त्याच वेळी, सौरव गांगुली, रिकी पाँटिंग आणि सईद अन्वर यांनी आयसीसीच्या बाद फेरीत प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत.

आयसीसीच्या बाद फेरीत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज –

३ – सौरव गांगुली
३ – रिकी पाँटिंग
३ – सईद अन्वर
२ – स्टीव्ह स्मिथ
२ – महेला जयवर्धने
२ – रोहित शर्मा
२ – शेन वॉटसन

आयसीसीच्या बाद फेरीत स्टीव्ह स्मिथने केलेली धावसंख्या –

२०१५ विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानविरुद्ध ६५ धावा
२०१५ विश्वचषक उपांत्य फेरीत भारताविरुद्ध १०५ धावा
२०१५ विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५६* धावा विरुद्ध
२०१९ विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ८५ धावा
२०२१ टी-२० विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५ धावा
२०२३ डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताविरुद्ध १२१ धावा