|| अन्वय सावंत

नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने दुबई येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत रशियाच्या इयान नेपोम्निशीवर विजय मिळवत सलग पाचव्यांदा जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान पटकावला. हा निकाल बुद्धिबळ समीक्षक आणि चाहत्यांना अपेक्षित होता. मात्र, कार्लसनने ज्या सहजतेने नेपोम्निशीला धूळ चारली, त्याचे अनेकांना आश्चर्य वाटले.

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये खेळवली जाते. गतविजेत्याला रोखण्यासाठी आव्हानवीराच्या स्पर्धेतून एका खेळाडूची निवड केली जाते. आघाडीच्या बुद्धिबळपटूंमध्ये दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा नेपोम्निशीने बाजी मारत कार्लसनला जगज्जेतेपदासाठी आव्हान देण्याचा हक्क प्राप्त केला. तो जागतिक लढतीत कार्लसनला कडवी झुंज देईल, अशी सर्वांना आशा होती.

कार्लसन हा वेळ घेऊन विचारपूर्वक चाली रचण्यासाठी, तर नेपोम्निशी आक्रमक शैलीतील खेळासाठी ओळखला जातो. त्यामुळे भिन्न पद्धतीने खेळणाऱ्या या दोन ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंमधील चुरस पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यातच करोनाकाळात बुद्धिबळाची लोकप्रियता वाढल्याने दोन्ही खेळाडूंवर अपेक्षांचे अतिरिक्त दडपण होते.

सर्वोत्तम १४ डावांच्या या लढतीत सुरुवातीला कार्लसन आणि आव्हानवीर नेपोम्निशीने तोडीस तोड खेळ केला. दोघांनीही अतिआक्रमक चाली रचणे टाळले. त्यामुळे पाच डावांनंतर दोघांमध्ये २.५-२.५ अशी बरोबरी होती. सलग पाच डाव बरोबरीत सुटले असले, तरी कार्लसन हळूहळू वरचढ होत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे नेपोम्निशीला अधिक विचारपूर्वक आणि सावध खेळ करावा लागणार होता. मात्र, त्यात तो अपयशी ठरला.

पहिल्यांदा जागतिक अजिंक्यपद लढतीत खेळणाऱ्या नेपोम्निशीने दडपणात चुका करण्यास सुरुवात केली. याउलट, मागील चार जागतिक अजिंक्यपद लढतींत विश्वनाथन आनंद (२०१३ व २०१४), सर्गे कार्याकिन (२०१६) आणि फॅबिओ कारुआना (२०१८) यांसारख्या एकापेक्षा एक सरस खेळाडूला पराभूत करणाऱ्या कार्लसनने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. हाच त्याच्यातील आणि नेपोम्निशीमधील प्रमुख फरक ठरला. तब्बल सात तास आणि ४७ मिनिटे चाललेल्या विक्रमी सहाव्या डावात कार्लसनने विजयाची नोंद केली. मग आठव्या आणि नवव्या डावांत नेपोम्निशीने मोठ्या चुका करत कार्लसनला आघाडी बहाल केली. ‘‘नेपोम्निशीला बहुधा दडपण जाणवले. इतर प्रतिस्पध्र्यांपेक्षा त्याच्याकडून चूक होण्याची शक्यता मला अधिक जाणवते,’’ असे कार्लसन स्पष्टपणे म्हणाला.

कार्लसनने त्याचे वर्चस्व केवळ बोलण्यातून नाही, तर खेळातूनही सिद्ध केले. दहावा डाव बरोबरीत सुटल्यावर जगज्जेतेपद राखण्यासाठी कार्लसनला उर्वरित चार डावांत केवळ एका गुणाची आवश्यकता होती. ११व्या डावात तो लढत जिंकण्याचे ध्येय बाळगूनच खेळला. मोठ्या फरकाने पिछाडीवर असलेला नेपोम्निशी ‘पुन्हा’ सर्वोत्तम खेळ करण्यात अपयशी ठरला. कार्लसनने २३व्या चालीत चलाखीने घोड्याचा बळी दिला आणि पुढे नेपोम्निशीला चुका करण्यास भाग पाडले. यातून तो सावरू शकला नाही. आपल्याला पुनरागमन करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर ४९व्या चालीनंतर नेपोम्निशीने हार पत्करली आणि कार्लसनचे जागतिक बुद्धिबळावरील ‘राज्य’ पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्याने ही लढत ७.५-३.५ अशा फरकाने जिंकत १.२ मिलियन युरोचे रोख बक्षीस आपल्या नावे केले.

या लढतीपूर्वीच कार्लसनची सर्वकालीन महान बुद्धिबळपटूंमध्ये गणना केली जात होती. मात्र, आता त्याने सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. वयाच्या ३१व्या वर्षीच त्याने अनेक कीर्तिमान रचले आहेत. २०१३ मध्ये आनंदला शह देत पहिल्यांदा जगज्जेतेपद मिळवणाऱ्या कार्लसनने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. जागतिक क्रमवारीत तो दशकभर अव्वल स्थानावर कायम असून त्याच्या खात्यात सध्या एलो २८६५ गुण आहेत. त्याच्यात आणि दुसऱ्या स्थानावरील अलीरेझा फिरौझामध्ये तब्बल ६१ एलो गुणांचे अंतर आहे. तर फिरौझा (२८०४ गुण) आणि १६व्या स्थानावरील आनंद (२७५१ गुण) यांच्यात ५३ गुणांचे अंतर आहे. यावरूनच कार्लसनचे वर्चस्व स्पष्ट होते.

क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर, फुटबॉलमध्ये पेले, दिएगो मॅराडोना, लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारखे सर्वकालीन महान खेळाडू घडले. त्यांच्या अनन्यसाधारण कामगिरीमुळे इतर खेळाडूंचे यश झाकोळले गेले. प्रत्येकच खेळात काही दशकांमध्ये असा एक खेळाडू घडतो, जो त्या खेळाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. कार्लसनची वाटचाल याच दिशेने होत आहे.

उल्लेखनीय खेळ, आत्मविश्वास, निडरपणा याचसह स्पष्टपणे बोलण्याची वृत्ती यामुळे कार्लसनने केवळ बुद्धिबळात नाही, तर जागतिक खेळांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. खेळ सुरू होण्यापूर्वीच त्याच्या प्रतिस्पर्ध्याला खूप दडपण जाणवते. नेपोम्निशीला हे दडपण हाताळणे जमले नाही. आता भविष्यात कार्लसनची घोडदौड कोणी रोखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

anvay.sawant@expressindia.com