वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय फुटबॉलमध्ये आधीच अनिश्चितता असताना देशातील अव्वल दर्जाची ‘आयएसएल’ स्पर्धा स्थगित केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक झाल्याची टिप्पणी राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्रीने केली आहे.

‘‘काही आठवडय़ांपूर्वी मला फोन आला आणि हंगामापूर्वीचे आपले सराव शिबीर दोन आठवडय़ांनी पुढे ढकलण्यात आल्याचे बंगळूरु क्लबकडून सांगण्यात आले. सुरुवातीला मी खूश होता. मात्र, पुढे दोन आठवडय़ांचे रूपांतर अनिश्चित काळात झाले. मी आता कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे मला आणखी किती काळ खेळायला मिळणार याची सुरुवातीला चिंता वाटू लागली. मात्र, जेव्हा विविध क्लबमधील खेळाडूंशी संवाद साधला, तेव्हा केवळ स्वत:चा विचार करणे योग्य नसल्याचे मला जाणवले,’’ असे छेत्रीने समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

‘‘विविध क्लबचे खेळाडू, कर्मचारी, फिजिओ, मालिश करणाऱ्यांकडूनही मला चिंता व्यक्त करणारे दूरध्वनी आणि संदेश आले आहेत. देशातील फुटबॉल परिसंस्थाच मुळात अनिश्चिततेचा सामना करत आहेत. त्यामुळे त्याच्याशी निगडित असलेला प्रत्येक जण चिंतेत आणि घाबरलेला आहे,’’ असेही छेत्रीने म्हणतो.

फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) यांच्यात लीगच्या मुख्य अधिकारासाठी करण्यात आलेल्या ‘मास्टर राइट्स करारा’च्या (एमआरए) नूतनीकरणावरून संघर्ष सुरू आहे. यामुळे सध्या तरी ऑक्टोबरपासून सुरू होणारी ‘आयएसएल’ स्थगित ठेवण्यात आली आहे.

‘‘हा निर्णय झाला तेव्हा मी तंदुरुस्त होण्यासाठी वेळ घेतला होता. मात्र, १५ दिवसांसाठी घेतलेला विश्रांतीचा कालावधी अनिश्चित काळापर्यंत वाढला आहे. खेळ चालवण्यासंदर्भात सर्वच जण वाटाघाटी करत आहेत. या संदर्भात लवकरच ठोस निर्णय निघेल अशी आशा आहे,’’ असे छेत्री म्हणाला. ‘‘अशा परिस्थितीत फुटबॉलशी निगडित असलेल्या प्रत्येकानेच शांत राहा, एकत्र राहा, प्रशिक्षण घेत राहा आणि देत राहा. फुटबॉल लवकरच सुरू होईल यावर विश्वास ठेवा,’’ असे आवाहनही त्याने खेळाडू आणि खेळाशी निगडित प्रत्येकाला केले आहे.

‘मास्टर राइट्स करार’ नेमका काय?

‘आयएसएल’ला सुरुवात झाली तेव्हा देशातील फुटबॉल प्रसारासाठी आणि लीग चालवण्यासाठी फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) ही कंपनी सुरू करण्यात आली.

यासाठी १० वर्षांचा ‘मास्टर राइट्स करार’ अर्थात ‘एमआरए’ करण्यात आला. हा करार डिसेंबर २०२५ मध्ये संपत आहे.

‘आयएसएल’ कशी घ्यायची, पुरस्कर्ते कसे आणायचे, प्रसारण अधिकार याबाबतचे सर्व निर्णय या ‘एफएसडीएल’कडे सोपविण्यात आले. तेव्हा कुठल्याही प्रकारची निविदा किंवा अन्य कुठलीही नियमावली न करता थेट रिलायन्सची निवड करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता करार संपताना लीग चालविण्याचे अधिकार रिलायन्सलाच द्यायचे की अन्य कुठल्या कंपनीशी चर्चा करायची याबाबत तोडगा निघालेला नाही.