Sunil Gavaskar’s Prediction On Abhishek Sharma’s Performence In Asia Cup Final: नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला धूळ चारत तब्बल ९व्यांदा या स्पर्धेवर आपले नाव कोरले. भारताच्या या जेतेपदात सलामीवीर अभिषेक शर्माचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, त्याला अंतिम सामन्यात आपली चमक दाखवता आली नव्हती. तो स्वस्तात बाद झाला. पण मध्यफळीतील फलंदाज तिलक वर्माने दमदार खेळी करत भारताला एकट्याच्या जोरावर विजय मिळवून दिला.
दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी, अंतिम सामन्यात जरी अभिषेक शर्मा अपयशी ठरला तरी याचा भारतावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले होते. याचबरोबर भारताकडे सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शुभमन गिल आणि संजू सॅमसनसारखे खेळाडू असल्याचा उल्लेख केला होता, ज्यांच्यामध्ये एकट्याच्या जीवावर सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे.
अभिषेक शर्माने अंतिम सामन्यापूर्वी आशिया चषकातील सहा सामन्यांमध्ये ५१.५० च्या सरासरीने आणि २०४.६३ च्या स्ट्राइक रेटने ३०९ धावा केल्या होत्या. मात्र, अंतिम सामन्यात तो केवळ ५ धावांवर बाद झाला. इतकेच नव्हे, तर अभिषेकनंतर सूर्यकुमार आणि गिलही स्वस्तात बाद झाल्याने भारत कठीण परिस्थितीत होता.
पण, सुनील गावसकर यांनी अंतिम सामन्यापूर्वी म्हटल्याप्रमाणे अभिषेक अपयशी ठरल्यानंतरही तिलक वर्माने एक बाजू लावून धरली आणि संजू सॅमसनबरोबर एक महत्त्वाची भागीदारी केली, जी या सामन्याच्या विजयाचा पाया ठरली.
भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर तिलक वर्माने डावाची सूत्रे हाती घेत भारताला एकट्याच्या जीवावर विजय मिळवून दिला. यामध्ये त्याने ६९ धावांचे योगदान दिले. त्याला शिवम दुबेने ३३ आणि संजू सॅमसनने २४ धावा करत मोलाची साथ दिली.
काय म्हणाले होते गावसकर?
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर इंडिया टुडेशी बोलताना, सुनील गावसकर म्हणाले होते की, “आपल्याकडे असे अनेक महत्त्वाचे खेळाडू आहेत, जे एकट्याच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलू शकतात. सूर्यकुमार यादवला धावा काढाव्या लागतील, तसेच तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्यालाही धावा काढाव्या लागतील. शुभमन गिलने अपेक्षित असलेली मोठी खेळी अद्याप केलेली नाही. भारतीय फलंदाजीत खूप क्षमता आहे, त्यामुळे अभिषेक शर्मा जरी लवकर बाद झाला तरी जास्त काळजी करण्याची गरज नाही.”