Sunil Gavaskar on Rohit and Virat: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबरला पर्थच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. जवळपास सात महिन्यानंतर भारतीय क्रिकेट संघात परतलेले रोहित शर्मा, विराट कोहली अपयशी ठरले. त्यांना फारशी चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. रोहित ८ तर विराट ० धावा करून बाद झाले. या दोघांकडून संघ आणि क्रिकेट चाहत्यांना फार मोठी अपेक्षा होती. मात्र आता त्यांना अपयश आल्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मोठे विधान केले आहे.

ऑस्ट्रेलिया विरोधात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ते एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रीत करतील अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र पहिल्याच सामन्यात त्यांना अपयश आल्यानंतर विविध चर्चांना पेव फुटले आहे.

रविवारी पर्थ येथे झालेला सामना पावसामुळे चार वेळा थांबविण्यात आला होता. खूप वेळ वाया गेल्याने अखेर सामना २६-२६ षटकांचा करण्यात आला. यात भारताने प्रथम ९ बाद १३६ अशी धावसंख्या उभारली. डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर १३१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. कर्णधार मिचेल मार्श (५२ चेंडूंत नाबाद ४६) आणि जोश फिलिपे (२९ चेंडूंत ३७) यांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांतच हे आव्हान पार करताना मालिकेची विजयी सुरुवात केली.

सुनील गावस्कर काय म्हणाले?

दरम्यान रोहित आणि विराटला अपयश आल्यानंतर सुनील गावस्कर म्हणाले, “कदाचित ते दोघे ऑस्ट्रेलियातील सर्वात उसळत्या खेळपट्टीवर खेळत होते. ज्या खेळाडूंनी काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही त्यांच्यासाठी हे सोपे नव्हते. नियमित क्रिकेट खेळणाऱ्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठीही हे आव्हानात्मक होते.”

तर आश्चर्य वाटणार नाही…

इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “भारत अजूनही खूप चांगला संघ आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. रोहित आणि विराटने पुढील दोन सामन्यात मोठी धावसंख्या उभारली तर आश्चर्य वाटणार नाही. काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर ते पुनरागमन करत आहेत. ते जितके जास्त खेळतील तितका वेळ ते नेटमध्ये सराव करतील. कदाचित २२ ऐवजी २० वर्षांच्या राखीव गोलंदाजांकडूनही त्यांना गोलंदाजी करावी लागेल. तेवढी लवकर त्यांना लय पकडता येईल. एकदा का ते धावा करायला लागले तर भारताची धावसंख्या सहज ३०० पेक्षा अधिक होईल.”