भारतीय संघाचं कसोटी, वन डे आणि टी २० सामन्यात नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने विश्वचषकानंतर टी २० संघाचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीनं पत्रात म्हटलं आहे. यानंतर आता वन डे कर्णधारपदाचं काय होणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. तर माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी आपली मतं यावर व्यक्त केली आहेत. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही आपल्या मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी विराट कोहलीचं पत्र वाचलं. रवी शास्त्री, रोहित, गांगुली आणि निवडकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे. पांढऱ्या चेंडूच्या कर्णधारपदावर गेल्या सहा महिन्यांपासून बरीच चर्चा झाली. बीसीसीआय आणि निवडकर्ते त्याच्या पांढऱ्या चेंडूच्या कर्णधारपदावर खूश नव्हते. त्यामुळेच त्याने कर्णधारपद सोडलं आणि दुसऱ्याला नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला.”, असं सुनील गावस्कर यांनी आज तकशी बोलताना सांगितलं. “त्याने पत्रात नमूद केले की त्याला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व करायचे आहे. त्याच्या वनडे कर्णधारपदाचा निर्णय आता निवडकर्त्यांवर आहे. त्याच्या कसोटी कर्णधारपदावर प्रश्नच नाही. एकदिवसीय कर्णधारपदामध्ये बदल होणार का? यावर लक्ष ठेवले पाहिजे,”, असं माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सांगितलं.

“यावर चर्चेचा प्रश्नच येत नाही”

विराट कोहलीनंतर टी-२० संघाचा कर्णधार कोण होणार? याविषयी मदन लाल म्हणतात, “या मुद्द्यावर चर्चा करण्यात मला काहीही अर्थ वाटत नाही. या जबाबदारीसाठी रोहीत शर्मा हाच एक पर्याय आहे. रोहित शर्मानं तब्बल पाच वेळा मुंबई इंडियन्स संघाला आपल्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवून दिलं आहे. जर तो भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार झाला, तर त्याच्या या अनुभवाचा संघाला फायदाच होईल”. दरम्यान, “रोहित शर्माला टी-२० संघाचा कर्णधार केलं आणि त्यानं चांगली कामगिरी केली, तर निवडकर्ते त्याचा एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून देखील विचार करतील”, असं देखील मदन लाल म्हणाले.

विराट कोहलीची टी २० कर्णधारपदाची कारकिर्द

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकूण ४५ टी २० सामने खेळला आहे. त्यात २७ सामन्यात विजय तर १४ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar on virat kohli one day captaincy rmt
First published on: 16-09-2021 at 21:45 IST