पर्थ : केएल राहुलला धावा करण्यात सातत्याने अपयश येत असले, तरी त्याची जागा घेण्यासाठी सलामीवीराचा दुसरा पर्याय भारतीय संघात उपलब्ध नाही. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी राहुलचे भारतीय संघातील स्थान सुरक्षित आहे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यांत राहुलने निराशाजनक कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध ८ चेंडूंत ४ धावा, नेदरलँड्सविरुद्ध १२ चेंडूंत ९ धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ चेंडूंत ९ धावा ही राहुलची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय ठरते आहे. तसेच त्याच्यात आत्मविश्वासाचीही कमतरता आहे. भारतीय संघाचे मन:स्थिती प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी राहुलचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अधिक मेहनत घेतली पाहिजे, असे गावस्कर यांना वाटते.
‘‘पॅडी अप्टन हे भारतीय संघाचे मन:स्थिती प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी राहुलचा आत्मविश्वास वाढावा यासाठी काहीही केल्याचे जाणवत नाही. फलंदाजी प्रशिक्षक राहुलच्या फलंदाजीतील चुका दूर करू शकतात. मात्र, त्याचा आत्मविश्वास वाढावा यासाठी मन:स्थिती प्रशिक्षकांनी त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. तू प्रतिभावान खेळाडू आहेस आणि तुझ्यात मोठय़ा खेळी करण्याची क्षमता आहे, हे त्यांनी राहुलला सांगितले पाहिजे. तसे केल्यास त्याचा आत्मविश्वास वाढू शकेल,’’ असे गावस्कर म्हणाले.
भारतीय संघात राहुल आणि रोहित शर्मा वगळता एकाही सलामीवीराचा समावेश नाही. ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी यापूर्वी सलामीवीराची भूमिका बजावली आहे. मात्र, राहुलला वगळून त्यांना सलामीला संधी मिळण्याची फारशी शक्यता नाही.
‘‘भारतीय संघात सलामीवीरांच्या पर्यायांची कमतरता आहे. राहुलची जागा घेण्यासाठी भारताकडे दुसरा सलामीवीर उपलब्ध नाही. त्यामुळे भारतीय संघाने राहुलला पािठबा दर्शवत राहणे गरजेचे आहे. त्याला सूर गवसल्यावर तो काय करू शकतो हे सर्वाना ठाऊक आहे,’’ असे गावस्कर यांनी नमूद केले.
कठीण निर्णय घेणे गरजेचे -हरभजन
ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांत संघनिवड करताना भारताला कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केली. ‘‘राहुल अप्रतिम खेळाडू आहे. त्याच्यात सामने जिंकवण्याची क्षमता आहे, यात शंका नाही. मात्र, सध्या त्याला धावांसाठी झगडावे लागते आहे. त्यामुळे भारताने काही अवघड निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यांनी ऋषभ पंतला संधी द्यावी. तो सलामीला खेळू शकतो. त्याच्या डावखुरेपणाचा भारताला फायदा होऊ शकेल,’’ असे हरभजन म्हणाला.
कार्तिकच्या पाठीला दुखापत
अॅडिलेड : भारताचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकात बुधवारी होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी कार्तिकच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात कार्तिकची पाठ दुखावली. त्यामुळे आफ्रिकेच्या डावातील १६व्या षटकात कार्तिक मैदानाबाहेर गेला आणि ऋषभ पंतने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली. आता कार्तिकला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागल्यास पंतला अंतिम ११ जणांत स्थान मिळेल. कार्तिकची दुखापत किती गंभीर आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
कोहलीच्या खोलीची चित्रफित प्रसारित; हॉटेलचा माफिनामा
पर्थ : पर्थ येथील ‘क्राउन रिसॉर्ट’ हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने विराट कोहलीच्या खोलीत जाऊन चित्रफित तयार केली. त्यानंतर या कर्मचाऱ्याने ही चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारितही केली. यावर कोहलीने आक्षेप घेतला असून ‘इस्टाग्राम’च्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला.
‘‘मला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी कायमच चाहत्यांचा ऋणी आहे. मात्र, एका व्यक्तीने माझ्या हॉटेलमधील खोलीत येऊन चित्रफित काढणे हे भयावह आहे. चाहत्यांचे प्रेम मी समजूच शकतो, पण इतरांचे खासगी आयुष्य जपणे गरजेचे आहे,’’ असे कोहलीने आपल्या ‘इन्टाग्राम’वरील पोस्टमध्ये लिहिले.
कोहलीने आक्षेप नोंदवल्यानंतर ‘क्राउन रिसॉर्ट’ हॉटेलने या घटनेबद्दल माफी मागितली.