इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) २०२३ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गतविजेत्या गुजरात टायटन्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. अखेरच्या षटकात चेन्नईला १३ धावांची आवश्यकता होती. तेव्हा अष्टपैलू रवींद्र जडेजाने करिष्मा दाखवत संघाला विजय मिळवून दिला. यासह चेन्नईने आपलं पाचवं विजेतेपद पटकावलं आहे. पण, चेन्नईच्या विजयानंतर गोलंदाज मोहित शर्माच्या अखेरच्या षटकाची चर्चा जास्त होत आहे. अखेरच्या षटकात गुजरात विजयी होईल असं वाटत होतं. कारण, अखेरच्या षटकात मोहित शर्माने पहिल्या चार चेंडूत केवळ ३ धावा दिल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला २ चेंडूत १० धावांची गरज होती. पण, जडेजाने षटकातील ५ व्या चेंडूवर षटकार आणि ६ व्या चेंडूवर चौकार लगावत चेन्नईला विजय मिळवून दिला. हेही वाचा : “पुजारा हाच एकमेव फलंदाज कसोटी फॉरमॅटसाठी बनवला जातो का?” WTC फायनलपूर्वी सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सवाल मात्र, मोहितच्या ४ चेंडूंनंतर पाणी पिण्यासाठी सामना थोड्या वेळासाठी थांबवण्यात आला होता. यावेळी गुजरातचा गोलंदाज प्रशिक्षक आशिष नेहराला मोहितला सल्ला द्यायचा होता. यावरूनच आता माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याला खडसावलं आहे. "मला माहिती नाही तिथे काय झालं. पहिले तीन-चार चेंडू मोहितने चांगले टाकले. त्यानंतर अचानक त्याच्यासाठी पाणी पाठवलं. तेव्हा तिथे हार्दिक पांड्या आला आणि त्याच्याशी चर्चा केली… गोलंदाज आपल्या लयीत असतो, त्यावेळी तो त्याच्या रणनीतीसाठी मानसिकदृष्ट्या तयार असतो. हार्दिकने काहीही बोलायला नको होतं," असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं. हेही वाचा : चेन्नईच्या विजयानंतर प्रशिक्षक आणि खेळाडूंनी केले माहीचे कौतुक, श्रीनिवासन म्हणाले, “धोनी हा असा जादूगार…” "मोहितशी बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण, हार्दिक बोलत असताना तो इकडं-तिकडं पाहत होता. तेव्हाच मोहितची रणनीती बदलली आणि त्याने आपली लय गमावली," असं सुनील गावस्करांनी सांगितलं. ते 'स्पोर्ट्स टुडे'शी बोलत होते.