Anderson Tendulkar Trophy Name IND vs ENG Test Series: भारत वि. इंग्लंड कसोटी मालिकेला नवीन नावं देण्यात आलं आहे. ही मालिका आता यापुढे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ओळखली जाणार आहे. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्या नावावरून या ट्रॉफीचं नाव ठेवण्यात आलं आहे. भारत-इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वी या नव्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. पण या ट्रॉफीच्या नावाबाबत सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी नवीन ट्रॉफीच्या नावावर भारतीय क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गावस्कर यांनी नुकत्याच सुरू झालेल्या ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’चे नाव बदलून ‘तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी’ करावी असं म्हटलं आहे. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी यापूर्वी पटौदी ट्रॉफी या नावाने ओळखली जात असे. चिन तेंडुलकरचे योगदान आणि वरिष्ठता लक्षात घेता त्याचे नाव प्रथम आले पाहिजे असे सुनील गावस्कर यांचे मत आहे. गावस्कर यांनी मिड-डे मधील त्यांच्या स्तंभलेखात लिहिलं आहे की इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) त्यांच्या इच्छेनुसार ट्रॉफीचे नाव देण्याचा अधिकार असला तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी तेंडुलकरच्या आधी जेम्स अँडरसनचे नाव पाहणं आश्चर्यकारक आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावावर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य
सुनील गावस्कर म्हणाले, “ईसीबीकडे (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) या मालिकेला कोणतंही नाव देण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु बहुतेकांसाठी, अगदी सर्वांसाठी नाही तर, भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी तेंडुलकरच्या आधी अँडरसनचं नाव पाहणं धक्कादायक गोष्ट आहे. सचिन तेंडुलकर कपिल देव यांच्यासह केवळ महान भारतीय क्रिकेटपटूच नाही तर अँडरसनपेक्षा १२ वर्षांनी मोठा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये धावा आणि शतकांच्या बाबतीत तो पहिल्या स्थानी आहे. तर परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्येही सर्वांपेक्षा जास्त धावा त्याच्या नावावर आहेत.”
गावस्कर यांनी मिड-डे मधील त्यांच्या स्तंभात पुढे लिहिलं, “कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड तेंडुलकरइतका चांगला नाहीये. तेंडुलकर हा विश्वचषक विजेत्या संघाचा देखील भाग आहे जो अँडरसन नव्हता. जिमी अँडरसन एक उत्तम गोलंदाज होता पण प्रामुख्याने इंग्लंडच्या परिस्थितीत आणि परदेशात त्याचा रेकॉर्ड तेंडुलकरइतका चांगला नाही. मी भारतीय माध्यमांसह सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनाही तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणण्याचे आवाहन करतो.”
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी ही ईसीबी आणि बीसीसीआय यांच्या संयुक्त उपक्रमातून आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. या नव्या नावापूर्वी इंग्लंडमधील मालिका ही पतौडी ट्रॉफीच्या नावाने ओळखली जात होती तर भारतातील मालिका अँथनी डी मेलो ट्रॉफी या नावाने खेळवली जात होती.