Suryakumar Yadav on Jasprit Bumrah performance in Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने ६ गडी व ७ चेंडू राखून पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय संघ या सामन्यात सर्व आघाड्यांवर पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरला. भारतीय संघाला केवळ क्षेत्ररक्षण सुधारण्याची आवश्यकता आहे. या सामन्यात भारताचे सर्व खेळाडू चमकले. मात्र, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जलंदगती गोलंदाच जसप्रीत बुमराह मात्र सपशेल अपयशी ठरले.

कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात भोपळा देखील फोडू शकला नाही. तर जसप्रीत बुमराह एकही विकेट मिळवू शकला नाही. उलट त्याने ४ षटकात तब्बल ४५ धावा दिल्या. तो भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

जसप्रीत बुमराह सपशेल अपयशी

या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमारने प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी बुमराहच्या फॉर्मविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र सूर्यकुमार बुमराहच्या पाठिशी उभा राहिला. बुमराहने या सामन्यात पॉवर प्लेमधील ३ षटकांत ३४ धावा दिल्या होत्या. त्याच्या कारिकिर्दीत पहिल्यांदाच त्याने पॉवर प्लेमध्ये इतक्या धावा दिल्या आहेत. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात तीन षटकांत ३१ धावा दिल्या होत्या.

सूर्यकुमार यादव बुमराहच्या पाठिशी

सूर्यकुमार यादव म्हणाला, “तो (बुमराह) रोज चांगली कामगिरी करू शकत नाही. आज त्याला विकेट मिळाली नाही म्हणून काही हरकत नाही. तो काही रोबोट नाही. काही दिवस वाईट असू शकतात. मात्र, शिवम दुबेने आम्हाला अवघड स्थितीतून बाहेर काढलं.”

“आता ही बरोबरीची लढत राहिलीच नाहीये”

कर्णधार सूर्याला भारत व पाकिस्तान संघामधील रायव्हलरीबद्दल (वैर/स्पर्धा) प्रश्न विचारला, यावर सूर्या म्हणाला, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात फार पूर्वीपासून एकापेक्षा एक कमालीचे सामने होत आले आहेत. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या ७ सामन्यांमध्ये भारतानेच विजय मिळवले आहेत. आता ही बरोबरीची लढत राहिलीच नाहीये. खरंतर मला या प्रश्नावर एक सांगायचं आहे की, तुम्ही या ‘रायव्हलरी’बाबत प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. कारण, जर दोन संघ १५-२० सामने खेळलेत आणि स्कोअरलाइन ७-७ किंवा ८-७ अशी असेल, तर त्याला रायव्हलरी म्हणता येईल. पण जर स्कोअरलाइन १०-१ किंवा १३-० अशी असेल, मला नक्की आकडा माहित नाही हा… तर मग ती रायव्हलरीच उरत नाही.”