भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडच्या दौऱ्यातही धावांचा पाऊस पाडण्याचा जलवा दाखवला आहे. सूर्यकुमारच्या आक्रमक फलंदाजीचा गजर संपूर्ण क्रिडा विश्वात वाजत आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकातही सूर्यकुमार यादवचा झंझावात पाहायला मिळाला होता. दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२२ मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
कोहलीच्या विक्रमाजवळ पोहोचला सूर्यकुमार
सूर्यकुमार यादव २०२२ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जास्त धावा करण्याच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. २०२२ मध्ये त्याने आतापर्यंत ४१ इनिंगमध्ये १५०३ धावा कुटल्या आहेत. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्यात अव्वल स्थान गाठलं आहे. विराटने २०१६ मध्ये १६१४ धावा केल्या आहेत. दरम्यान, सूर्यकुमार यादवकडे आता विराट कोहलीच्या पुढे जाण्याची संधी आहे. सूर्यकुमारने या चालू वर्षात आणखी ११२ धावांची भर पाडली, तर एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या क्रमवारीत भारताकडून सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर येईल.
एका वर्षात भारतीय खेळाडूंची टी-२० क्रिकेटची कामगिरी
विराट कोहली – १६१४ धावा, (२०१६,२९ इनिंग)
सूर्यकुमार यादव – १५०३ धावा, (२०२२, ४१ इनिंग)
श्रेयस अय्यर – १२६४ धावा, (२०१९, ४२ इनिंग)
के एल राहुल, १२६२ धावा, (२०१९, ३१ इनिंग)
रिषभ पंत, १२०९ धावा, (२०१८, ३१ इनिंग)