Suryakumar Yadav on Mohsin Naqvi Asia Cup trophy controversy : भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखून दणदणीत पराभव केला. पण या विजयानंतर मोठे नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी नाकारण्यात आली आणि याचे कारण म्हणजे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी हे ट्रॉफी आणि मेडल घेऊन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरून निघून गेले.

नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख तसेच पाकिस्तान सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असल्याने त्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने नकार दिला. भारताने आपण ट्रॅफी नक्वी यांच्याकडून स्वीकारणार नसल्याचे सांगितल्यानंतर ट्रॉफी समारंभाच्या ठिकाणाहून बाजूला करण्यात आली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावरच ट्रॉफी शिवाय विजयाचा आनंद साजरा केला. या संपूर्ण प्रकारावर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारत विरूद्ध पाकिस्तान

आशिया चषक २०२५ स्पर्धेत पूर्णवेळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक कारणांमुळे वातावरण तापलेले होते. या स्पर्धेच्या काळात अनेकदा वाद झाले, ज्यामध्ये भारताने हस्तांदोलन करण्यास नकार देणे, ते चिथावणीखोर हवभाव करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. मात्र अंतिम सामन्यात हा वाद वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचला. सामना संपल्यानंतर बक्षीस विचरणाचा कार्यक्रम हा जवळपास एका तासाने सुरू झाला. त्यातही भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. ज्यामुळे आयोजकांची एकच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

प्रोटोकॉलनुसार आशिया चषकाची ट्रॉफी एसीसीचे अध्यक्ष म्हणजेच नक्वी यांच्या हस्ते देणे अपेक्षित होते. मात्र, भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे नक्वी यांनी सातत्याने एसीसी अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका योग्यपणे पार पाडली नाही. त्यांनी नेहमी एकांगी भूमिका घेऊन पाकिस्तान क्रिकेटला पुढे ठेवले.

सेरेमनी ही ४५ मिनिटे उशीराने सुरू झाली आणि जेव्हा ती सुरू झाली तेव्हा नक्वी हे प्रझेंटेशन डायसवर उभे असलेले दिसून आले. यादरम्यान भारतीय खेळाडू कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांनी त्यांची वैयक्तिक बक्षिसे स्वीकारली. मात्र यावेळी ब्रॉडकास्टर सायमन डुल यांनी घोषणा केली की, “एसीसीने मला कळवले आहे की भारतीय संघ आज रात्री आपली पारितोषिकं स्वीकारणार नाही. त्यामुळे हा पारितोषिक समारंभ इथेच संपतो,” पण भारतीय संघाने एकत्रितपणे ट्रॉफी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवले नाही.

यानंतर सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा हे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेला हजर राहिले. यावेळी सूर्यकुमार यादवने बक्षीस न स्वीकारल्याबद्दल भाष्य करताना त्याने त्याच्या कारकि‍र्दीत अशी घटना कधीही पाहिली नसल्याचे म्हटले.

वादावर सूर्यकुमार यादव नेमकं काय म्हणाला?

सूर्यकुमार यादवने या संपूर्ण प्रकाराबद्दल अश्चर्य व्यक्त केलं, तो म्हणाला की, “ही एक गोष्ट आहे जी मी कधीही पाहिली नाही. मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून, मी क्रिकेटचे फॉलो करत आहे. एका चॅम्पियन संघाला ट्रॉफी नाकारण्यात आली. आणि तीही मोठ्या कष्टाने मिळवलेली. हे सहजपणे झालेले नाही. तर हा विजय कठोर परिश्रमातून मिळवलेला होता. आम्ही येथे ४ तारखेपासून आहोत आणि आज सामना खेळलो. दोन दिवसांत लागोपाठ दोन चांगले सामने खेळलो. मला वाटते की आम्ही यासाठी (ट्रॉफी) पात्र आहोत. आणि मी यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही. मला वाटते की मी खूप चांगल्या प्रकारे मांडले आहे,”

“जर तुम्ही ट्रॉफीबद्दल म्हणाल तर, माझ्या ट्रॉफी या ड्रेसिंग रुममध्ये बसल्या आहेत. सर्व १४ खेळाडू सर्व सपोर्ट स्टाफ माझ्याबरोबर आहे. ते खरी ट्रॉफी आहेत. आशिया कपच्या या प्रवासात मी या खेळांडूंचा खूप मोठा चाहता राहिलो आहे. मला वाटते की तेच खरी ट्रॉफी आहेत. खरे क्षण जे मी सुंदर आठवणी म्हणून परत घेऊन जात आहे जे पुढे कायम माझ्यासोबत राहतील. एवढेच,” असे सूर्यकुमार पुढे बोलताना म्हणाला.

संपूर्ण वादावर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की भारतीय संघाला ट्रॉफी मिळाली नाही याने काही फरक पडत नाही, संपूर्ण जगाला माहिती आहे की आशिया कप भारताने जिंकला आहे आणि त्यांच्या कामगिरीकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही.

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचे १४७ धावांचे लक्ष्य पाच विकेट्स आणि दोन चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. यामध्ये तिलक वर्माने ५३ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली.