Suryakumar Yadav Statement on India Win: भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषकातील अखेरचा सुपर फोरमधील सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघ भलेही आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता, पण टीम इंडियाने हा सामना काही साधारण म्हणून खेळत नव्हते. कर्णधाराने खेळाडूंना सामन्यापूर्वी काय म्हटलं होतं, याचा खुलासा त्याने केला आहे.

भारताने श्रीलंकेला विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य दिलं होतं, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २०२ धावा करू शकला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. सुपर ओव्हरमध्ये भारताकडून अर्शदीप सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि श्रीलंकेच्या कुसल परेराला पहिल्याच चेंडूवर झेलबाद केलं. यानंतर अर्शदीपच्या गोलंदाजीसमोर शनाका २ धावा करू शकला आणि बाद झाला.

श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी ३ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताकडून शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादवची जोडी मैदानात उतरली. तर गोलंदाजीसाठी हसरंगा आला. पण पहिल्याच चेंडूवर सूर्याने चेंडू टोलवला आणि मिसफिल्ड झाल्याने चेंडू अजून पुढे गेला. इतक्यात गिल आणि सूर्याने ३ धावा केल्या आणि भारताने सामना जिंकला. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान सूर्याने खेळाडूंना असं काही सांगितलं की ज्यामुळे खेळाडू मोठ्या जिद्दीने खेळले.

सूर्यादादाच्या एका वाक्याने खेळाडूंचं मनोबल उंचावलं अन्…

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव विजयानंतर म्हणाला, “हाच सामना फायनलसारखा वाटला. (हे बोलताच सूर्या हसायला गेला) दुसऱ्या डावातील पहिल्या भागात सर्वांनीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हटलं हा सेमीफायनलचा सामना असल्यासारखं खेळा. सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या एनर्जीने खेळूया आणि पाहूया पुढे काय होतं. सामना जिंकलो याचा आनंद आहे.” श्रीलंकेच्या निसांका आणि परेराची शतकी भागीदारी होत असताना सूर्याचं सेमीफायनलसारखं खेळा म्हणणं खेळाडूंसाठी नवी उमेद देणार ठरलं आणि कर्णधाराने दिलेला धीर पाहून सर्वांनी चांगली कामगिरी केली.

भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल म्हणाला, “कमालीची सुरूवात मिळतेय आणि त्यानंतर संजू, तिलकने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि अभिषेक बाद झाल्यानंतर धावा सातत्याने करत राहिले, हे महत्त्वाचं होतं. संजू सलामीला न उतरता खालच्या फलीत जबाबदारीने फलंदाजी करतोय आणि तिलकची कमालीची कामगिरी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरतेय, हे पाहून चांगलं वाटतंय.”

अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीबाबत सूर्या काय म्हणाला?

अर्शदीपच्या कमालीच्या गोलंदाजीवर सूर्या म्हणाला, “अर्शदीपने अशा अटीतटीच्या प्रसंगांमध्ये अनेक वेळा गोलंदाजी केली आहे आणि संघासाठी उत्तम कामगिरी केली आहे. तू तुझ्या प्लॅनप्रमाणे गोलंदाजी कर. मी त्याच्या प्लॅनप्रमाणे गोलंदाजी करत त्याने भारतासाठी आणि आयपीएलमध्ये कमाल कामगिरी करताना मी त्याला पाहिलं आहे. त्यामुळे मी त्याला सांगितलं आपण फायनलमध्ये आधीच गेलोय, पण तरीही तू तुझ्या प्लॅनप्रमाणे गोलंदाजी कर आणि बाकी कोणता विचार करू नकोस. पण त्याने ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी केली त्यातचं सर्व आलं आणि असंही सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी अर्शदीपशिवाय दुसरा पर्याय नाहीच.”

भारत०पाक फायनलबाबत काय म्हणाला भारताचा कर्णधार?

अंतिम सामन्याबद्दल सूर्या म्हणाला, “चांगला रिकव्हरी करू आणि फायनलचा आताच विचार करत नाही आहोत. आज खेळताना काही जणांना दुखापतींचा त्रास जाणवला. त्यामुळे उद्या चांगली रिकव्हरी करू आणि आजच्याप्रमाणेच रविवारीही सामना खेळण्यासाठी उतरू.” भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ मधील अंतिम सामना रविवारी २८ ऑगस्टला खेळवला जाणार आहे.