कोलकाता : तारांकित खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबईच्या संघाचे प्रथमच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असून शनिवारी अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे हिमाचल प्रदेशचे आव्हान असेल.
एकीकडे मुंबईच्या संघात कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, शिवम दुबे आणि शम्स मुलानी यांसारखे दर्जेदार खेळाडू आहेत. तर दुसरीकडे हिमाचलच्या संघात कर्णधार रिशी धवनचा अपवाद वगळता नामांकित खेळाडूंचा समावेश नाही. मात्र त्यांनी सांघिक कामगिरी करताना गतहंगामात विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे हिमाचलचा पराभव करण्यासाठी मुंबईला आपला सर्वोत्तम खेळच करावा लागेल.
विक्रमी ४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईला मुश्ताक अली स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही. यंदा मात्र रहाणेच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सातपैकी सहा साखळी सामने जिंकल्यानंतर मुंबईने उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्र, तर उपांत्य फेरीत विदर्भाला पराभूत केले. आता विजयी कामगिरी सुरू ठेवत पहिल्यांदा मुश्ताक अली स्पर्धा जिंकण्याचा मुंबईचा मानस असेल.
’ वेळ : सायं. ४.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २
