तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मालिकेत बाजी मारण्यात भारत यशस्वी झाला आहे. टी. नटराजनच्या रुपाने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत आश्वासक डावखुरा गोलंदाज मिळाला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत नटराजनने आश्वासक मारा करत संघाला दोघांचीही उणीव भासू दिली नाही. कर्णधार विराट कोहलीदेखील नटराजनच्या कामगिरीवर खुश झाला असून, आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून नटराजन भारतीय संघासाठी उपयुक्त ठरु शकतो असं मत विराटने व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – माझ्यासाठी तूच खरा मालिकावीर ! हार्दिक पांड्याने केलं नटराजनचं कौतुक

“नटराजनचं विशेष कौतुक, कारण त्याने शमी आणि बुमराहच्या अनुपस्थितीत खूप चांगला खेळ केला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दडपणाखाली असतानाही त्याने चांगला मारा केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो आपला पहिला सामना खेळतो आहे आणि अशा परिस्थितीतही त्याने केलेली खेळी ही कौतुकास्पद होती. तो खूप शांत आणि मेहनती आहे. आपल्याला काय करायचं आहे याची त्याला जाणीव आहे. तो असाच मेहनत करत राहिल अशी मला आशा आहे, कारण आगामी वर्षात विश्वचषक तोंडावर आला असताना डावखुरा गोलंदाज संघात असणं उपयुक्त ठरु शकतं.” तिसरा टी-२० सामना संपल्यानंतर विराटने नटराजनचं कौतुक केलं.

वन-डे मालिकेत अखेरच्या सामन्यात नटराजनला भारतीय संघात संधी देण्यात आली. यानंतर टी-२० मालिकेतही तिन्ही सामन्यात नटराजनने आश्वासक मारा करत भारताला महत्वाचे बळी मिळवून दिले. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या नटराजनने युएईत पार पडलेला आयपीएलचा तेरावा हंगाम गाजवला. यासाठीच त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान देण्यात आलं. नटराजननेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत स्वतःची निवड सिद्ध केली.