टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलँडने बांगलादेशला पराभूत करत स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलँडने २० षटकात ९ गडी गमवत १४० धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी १४१ धावांचं आव्हान ठेवलं. मात्र बांगलादेशचा संघ २० षटकात ७ गडी गमवून १३४ धावा करू शकला आणि ६ धावांनी पराभव झाला. या विजयात स्कॉटलँडच्या ख्रिस ग्रीव्हसचा मोलाचं योगदान होतं. असं असलं तरी ख्रिसचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अनेक संकटावर मात करत त्याचा इथपर्यंतचा प्रवास झाला आहे.

ख्रिस ग्रीवसचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी ख्रिस ग्रीव्हस अ‍ॅमेझॉनसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. स्कॉटलँड संघात खेळण्यासाठी ख्रिसनं प्रचंड मेहनत घेतली आहे. ख्रिसचा आतापर्यंतचा प्रवास उलगडताना त्याचा अभिमान वाटत असल्याचं कर्णधार काइल कोएत्झरनं सांगितलं. “मला ग्रीव्हसचा अभिमान वाटतो. त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यापूर्वी अ‍ॅमेझॉनसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. आता बांगलादेश विरुद्ध त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. हे सांगताना तो माझं कौतूक करेल की नाही याची मला खात्री नाही.”, असं कर्णधार कोएत्झरनं सांगितलं.

स्कॉटलँडच्या विजयात ख्रिस ग्रीव्हसचा मोलाचं योगदान राहिलं. ख्रिस ग्रीव्हसने २८ चेंडूत ४५ धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करताना ३ षटकात १९ धावा देत २ गडी बाद केले. या कामगिरीसाठी ख्रिसला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.