टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडिजला ८ गडी राखून पराभूत केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. आता वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने ७ गडी गमवून १५७ धावा केल्या होतं. वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाने २ गडी गमवून १७ व्या षटकात पूर्ण केलं. ग्रुप १ मधून इंग्लंडनं सलग चार सामने जिंकत उपांत्य फेरीत आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या संघासाठी चुरस आहे. जर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत केलं. तर मात्र तीन संघांपैकी ज्या संघाची धावगती चांगली असेल त्याला उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

ऑस्ट्रेलियाचा डाव
वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना डेविड वॉर्नर आणि एरॉन फिंच जोडीने चांगली सुरूवात करून दिली. मात्र संघाची धावसंख्या ३३ असताना फिंचच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. फिंच ११ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. दुसऱ्या गड्यासाठी डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्श जोडीने १२४ धावांची भागीदारी केली. संघाला विजयासाठी १ धाव हवी असताना मिशेल बाद झाला. त्याने ३२ चेंडूत ५३ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर डेविड वॉर्नरने ५६ चेंडूत ८९ धावा केल्या. या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

वेस्ट इंडिजचा डाव
वेस्ट इंडिज संघाला ख्रिस गेल आण इविन लेविस जोडीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र संघाची धावसंख्या ३० असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर ख्रिस गेलचा त्रिफळा उडाला आणि धावगती कमी झाली. त्यानंतर निकोलस पूरन ४ धावा करून बाद झाला. रोस्टोन चेसला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर इविन लेविस २९ धावा करून तंबूत परतला. शिमरॉन हेटमायर आणि किरोन पोलार्ड या जोडीने वेस्ट इंडिजचा डाव सावरला. हेटमायर २७ धावांवर असताना जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेला ड्वेन ब्रावोही काही खास करू शकला नाही आणि १० धावा करून तंबूत परतला. मात्र किरोन पोलार्डने एक बाजू सावरून धरली. मात्र मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. पोलार्डने ३१ चेंडूत ४४ धावा केल्या. या खेळीत ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

वेस्ट इंडिज- ख्रिस गेल, इविन लेविस, निकोलस पूरन, रोस्टोन चेस, शिमरॉन हेटमायर, अँद्रे रसेल, किरॉन पोलार्ड, जेसन होल्डर, ड्वेन ब्रावो, अकिल होसैन, हेडन वॉल्श ज्यूनिअर

ऑस्ट्रेलियाचा संघ- डेविड वॉर्नर, एरॉन फिंच, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वडे, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, एडम झम्पा