टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं उपांत्य फेरीचं आव्हान जर तर वर अवलंबून आहे. धावगती आणि अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केल्यास उपांत्य फेरीत जाण्याचा आशा बळावतील. तत्पूर्वी भारतानं स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ ८५ धावांवर बाद झाला. या सामन्यात रवींद्र जडेजाने ३, मोहम्मद शमीने ३, जसप्रीत बुमराहने २ आणि आर. अश्विनने १ गडी बाद केला. जसप्रीत बुमराहने दोन गडी बाद करताच त्याच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला. टी २० स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम त्याचा नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर होता.

युजवेंद्र चहलने आतापर्यंत खेळलेल्या टी २० स्पर्धेत एकूण ६३ गडी बाद केले आहेत. तर स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने दोन गडी बाद करत एकूण ६४ गडी टीपले आहेत. त्यामुळे भारताकडून टी २० स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान जसप्रीत बुमराहला मिळाला आहे.

स्कॉटलंडचा डाव

स्कॉटलंडचे सलामीवीर काइल कोएत्झर आणि जॉर्ज मुन्सी यांनी डावाची सुरुवात केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात स्कॉटलंडचा कप्तान काइल कोएत्झरचा (१) त्रिफळा उडवला. पॉवरप्लेच्या शेवटचे षटकात जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने धोकादायक मुन्सीला झेलबाद करत स्कॉटलंडला दुसरा धक्का दिला. मुन्सीने ४ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा केल्या. सहा षटकात स्कॉटलंडने २ बाद २७ धावा केल्या. मुन्सीनंतर स्कॉटलंडचे फलंदाज बिथरले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने सातव्या षटकात दोन धक्के दिले. जडेजाने बेरिंग्टनला आणि क्रॉसलाही तंबूत धाडले. शमीने टाकलेल्या १७व्या षटकात स्कॉटलंडने तीन फलंदाज गमावले. त्याने पहिल्या चेंडूवर मॅकलिओडची (१६) दांडी गुल केली. पुढच्या चेंडूवर शरीफ धावबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर शमीने अप्रतिम यॉर्कर टाकत अलास्डेअर इव्हान्सला बोल्ड केले. १८व्या षटकात स्कॉटलंडने आपला दहावा फलंदाजही गमावला. बुमराहने मार्क वॉटचा त्रिफळा उडवला. भारताने स्कॉटलंडला १० षटकांपेक्षा जास्त चेंडू निर्धाव खेळवले. स्कॉटलंडने १७.४ षटकात ८५ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर बुमराहला २ बळी घेता आले.