टी २० विश्वचषकात दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना सुरु आहे. दोन्ही संघांनी सुपर १२ फेरीतील पहिला सामना गमवला असल्याने हा सामना महत्त्वाचा आहे. मात्र या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने एक कठोर निर्णय घेतला आहे. संघातील स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार क्विंटन डिकॉकला आराम देण्यात आला आहे. डिकॉक दुखापतग्रस्त किंवा खराब फॉर्ममध्ये नाही, तरी सुद्धा त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. दक्षिण आफ्रिका बोर्डाने दिलेल्या आदेशाचं पालन करण्यास नकार दिल्याने कारवाई केल्याचं बोललं जात आहे. टी २० विश्वचषकात भाग घेणारे सर्व संघ ब्लॅक लाईव्ह मॅटर्स अभियानाचं समर्थन करताना दिसत आहेत. दुसरीकडे, वैयक्तिक कारणास्तव खेळत नसल्याचं कर्णधार टेम्बा बवुमा याने सांगितलं. त्याच्या ऐवजी संघात रीझा हेन्ड्रिकला स्थान देण्यात आलं आहे.

क्विंटन डिकॉकने ब्लॅक लाईव्ह मॅटर्सचं समर्थन करण्यासाठी सामन्यापूर्वी गुडघ्यावर बसण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिक सामन्यादरम्यान समालोचन पॅनलचा भाग आहे. त्याने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. क्विंटन डिकॉक आज सामना खेळत नाही कारण त्याला ब्लॅक लाईव्ह मॅटर्स अभियानाप्रकरणी स्टँड घेतला आहे, असं ट्वीट दिनेश कार्तिकने केलं आहे.

वेस्ट इंडिजचा संघ- लेंडल सिमॉन्स, इविन लेव्हिस, ख्रिस गेल, शिरमॉन हेडमायर, ड्वेन ब्रावो, निकोलस पूरन, किरोन पोलार्ड, अँद्रे रसेल, अकिल होसैन, हेडन वॉल्श ज्यूनिअर, रवि रामपॉल

दक्षिण आफ्रिकेचा संघ- टेम्बा बवुमा, रीझा हेन्ड्रिक, रसी वॅ दर दुस्सेन, एडन मारक्रम, डेविड मिलार, हेनरिच क्लासेन, ड्वीन प्रेटोरिअर, कासिगो रबाडा, केशव महाराज, अनरिच नोर्तजे, टबरेज शाम्सी