टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत स्कॉटलँड संघाने चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन सुरुच ठेवलं आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केल्यानंतर आता पापुआ न्यू गिनी संघाचा धुव्वा उडवला आहे. पापुआ न्यू गिनी संघाविरुद्धचा सामना स्कॉटलँडने १७ धावांनी जिंकला. या विजयासह स्कॉटलँडने सुपर १२ मध्ये स्थान जवळपास निश्चित झालं आहे. स्कॉटलँडचा संघ पात्रता फेरीतील ब गटात दोन विजयांसह अव्वल स्थानी आहे. स्कॉटलँडच्या खात्यात आता ४ गुण असून धावगती +०.५७५ इतकी आहे. स्कॉटलँडचा पुढचा सामना ओमानसोबत आहे.त्यामुळे बांगलादेशला आता ओमान आणि पापुआ न्यू गिनी विरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवावं लागणार आहे.

पापुआ न्यू गिनीचा डाव

स्कॉटलँडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. २० षटकात ९ गडी गमवत १६५ धावा करत पापुआ न्यू गिनीसमोर विजयासाठी १६६ धावांचं आव्हान ठेवलं.पापुआ न्यू गिनीच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. स्कॉटलँडने विजयासाठी दिलेल्या १६६ धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला दोन धक्के बसले. टॉनी उरा, लेगा सायका, अस्साद वाला, चार्ल्स अमिनी आणि सिमॉन अटई स्वस्तात बाद झाले. सेसे बाऊ आणि नॉर्मन वानुआने चांगली खेळी केली. मात्र विजय मिळवून देण्यात अपयश आलं. नॉर्मन वानुआ ४७ धावा करून बाद झाला. मात्र पापुआ न्यू गिनी संघ सर्वबाद १४८ धावाच करू शकला.

स्कॉटलँडचा डाव

स्कॉटलँडकडून आघाडीला आलेला जॉर्ज मुनसे आणि काइल कोएत्झर जोडी चांगली कामगिरी करू शकली नाही. संघाची धावसंख्या २२ असताना पहिला धक्का बसला. कोएत्झर ६ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर लगेच जॉर्ज मुनसे माघारी परतला. तिसऱ्या गड्यासाठी मॅथ्यू क्रॉस आणि रिची बेरिंगटॉन जोडीनं चांगली भागीदारी केली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. मॅथ्यू क्रॉसने ४५ धावा तर रिची बेरिंगटॉननं ७० धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात आलेले फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाही. एका पाठोपाठ एक करत बाद झाले. कलुम मॅकलेड (१०), मायकल लीक्स (९), ख्रिस ग्रीव्ह (२), मार्क वॅट (०), जोश डॅवे (०) अशी धावसंख्या करून बाद झाले. पापुआ न्यू गिनीकडून कबुओ मोरियाने सर्वाधिक ४ विकेट बाद केले.

स्कॉटलँडचा संघ- जॉर्ज मुनसे, काइल कोएत्झर, मॅथ्यू क्रॉस, रिची बेरिंगटॉन, कलुम मकलेड, मायकल लीक्स, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वॅट, जोश डॅवे, अलाडेअर इवान्स, ब्रॅड व्हिल

पापुआ न्यू गिनीचा संघ- टॉनी उरा, लेगा सायका, अस्साद वाला, चार्ल्स अमिनी, सेसे बाऊ, सिमॉन अटाइ, नॉर्मन वनुआ, किप्लिन डोरिगा, कबुआ मोरिया, नोसैना पोकाना