टी २० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला १० गडी राखून पराभूत केलं. तसेच वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध पराभूत होण्याची परंपराही खंडित केली. तसेच सुपर १२ फेरीत सलग ४ सामने जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रीडाप्रेमी आणि माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघांवर वारंवार निशाणा साधला आहे. आता माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने एक व्हिडिओ पोस्ट करत भारतीय संघाला डिवचलं आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाला मोठ्या फरकाने हरवल्याने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे अंतिम फेरीचा सामना भारत आणि पाकिस्तान संघात होऊ दे अशी आशा शोएब अख्तरने व्यक्त करत डिवचलं आहे.

“आम्ही भारत अंतिम फेरीत पोहोचावा याची वाट पाहात आहोत. कारण आम्ही भारताला अंतिम फेरीत हरवू इच्छित आहोत. यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत की, भारत अंतिम फेरीत यावा. आम्ही अंतिम फेरीत भारताला आणखी ‘मौका’ देऊ इच्छित आहे.” असं शोएब अख्तरने सांगितलं.

टी-२० विश्वकरडंक स्पर्धेत भन्नाट फॉर्मात खेळणाऱ्या पाकिस्तानने चौथ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. बाबरसेनेने नवख्या नामिबियाला ४५ धावांनी हरवले. भारताला १० गडी राखून पराभूत केलं. न्यूझीलंडला ५ गडी आणि ८ चेंडू राखून मात दिली. तर अफगाणिस्तानला ५ गडी आणि ६ चेंडू राखून पराभवाचं पाणी पाजलं.