टी २० वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामन्यात विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यात नशिबाने साथ दिली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विराटने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना पाकिस्तानसोबत झाला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही भारताने नाणेफेकीचा कौल हरला. त्यामुळे पुन्हा प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यानंतर आता अफगाणिस्तानसोबतही भारताने नाणेफेक गमावली आणि पहिली फलंदाजी करावी लागली होती. भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला. मात्र उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला आजही मोठा विजय आवश्यक आहे. भारताने आज जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला विश्रांती दिली असून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी दिली आहे.

विराट कोहलीने या वर्षी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवलं. त्यात १७ वेळा नाणेफेकीचा कौल हरला. विराट कोहलीने नाणेफेकीचा बाबतीत आपलं नशिब साथ देत नसल्याचं मान्य केलं आहे.

विराट कोहली नाणेफेक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आपल्या अंदाजात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राहुल द्रविड सर्वात वर!
नुकतीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेल्या राहुल द्रविडचा टॉस जिंकण्याच्या बाबतीत सर्वात वरचा क्रमांक लागतो. “विराट कोहलीनं आत्तापर्यंत नेतृत्व केलेल्या सामन्यांपैकी फक्त ४० टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. त्याउलट राहुल द्रविडचा हा रेकॉर्ड सर्वात उत्तम असून त्याने ५८ ते ६० टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. धोनीनं ४७-४८ टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. कोहली या यादीत सर्वात खाली आहे. याचा अर्थ कोहलीला नशीब साथ देत नाही”, असं आकाश चोप्रा म्हणाल्याचं स्पोर्ट्सकीडानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत – विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

स्कॉटलंड – काइल कोएत्झर (कर्णधार), जॉर्ज मुन्सी, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), रिची बेरिंग्टन, कॅलम मॅकलिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वॉट, सफयान शरीफ, अलास्डेअर इव्हान्स, ब्रॅडली व्हील.