आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात ग्रुप ए मधील सामना झाला. त्यात न्युझीलंडने श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. सिडनीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने सात गडी गमावून १६७ धावा केल्या. किवी संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने १०४ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.
न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकले. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असताना याच सामन्यातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी त्याने स्पिरिट ऑफ क्रिकेट अर्थातच खिलाडूवृत्ती याचा एक उत्कृष्ट नमुना सादर केला आहे.
स्पिरिट ऑफ क्रिकेटचे उदाहरण ग्लेन फिलिप्स
या खेळीदरम्यान ग्लेन फिलिप्सने एक अनोखा आदर्श ठेवला, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नॉन-स्ट्रायकर एंडला शेवटी धावबाद टाळण्याचा ग्लेन फिलिप्सकडे एक निश्चित मार्ग आहे जे स्पिरिट ऑफ क्रिकेटचे जिवंत उदाहरण आहे. नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी ग्लेन फिलिप्स धावपटूच्या स्थितीत दिसला. म्हणजेच तो धावण्यासाठी जसा स्टान्स घेतो तसा त्याने घेतला होता.
जोपर्यंत गोलंदाज चेंडू टाकत नाही तोपर्यंत ग्लेन फिलिप्स क्रीज सोडत नाही. परंतु, क्रीजमध्ये असताना, कोणत्याही धावपटूप्रमाणे, ग्लेन फिलिप्स धावा घेण्याच्या स्थितीत पूर्णपणे बसलेला दिसतो. गोलंदाजाच्या हातातून चेंडू बाहेर येताच ग्लेन फिलिप्स धाव घेण्यासाठी धावला. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या षटकात एकेरी धाव घेण्यासाठी जी नामी शक्कल लढवली त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मागील काही काळापासून सातत्याने खराब कामगिरी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन या सामन्यात देखील अपयशी ठरला. १३ चेंडूवर ७ धावा करत त्याने कसून रजिथाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल सोपवला. न्यूझीलंडने या विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.