गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केले आहे. ”करोनाच्या उद्रेकामुळे यंदाचा वर्ल्डकप भारताऐवजी यूएईत होईल. आम्ही आयसीसीला याबद्दल अधिकृतपणे कळवले आहे आणि याबद्दल तपशील तयार केला आहे”, असे गांगुलीने सांगितले.

ही स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होईल का, असे गांगुलीला विचारले गेले. तेव्हा तो म्हणाला, ”१७ ऑक्टोबरपासून स्पर्धा सुरू होईल, की नाही याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.” वर्ल्डकपबाबत विचार करण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला चार आठवड्यांचा वेळ दिला होता.

 

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील.  या अहवालानुसार टी-२० वर्ल्डकप दोन फेऱ्यांमध्ये खेळला जाईल. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. या अहवालानुसार, राऊंड १ मध्ये १२ सामने होणार असून त्यामध्ये ८ संघ भिडणार आहेत. ८ पैकी ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. सुपर १२ साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे.

हेही वाचा – विराटसोबतच्या त्या मिठीबद्दल केन विल्यमसन म्हणतो, ‘‘आम्ही दोघे….”

वर्ल्डकपपूर्वी होणार आयपीएल</strong>

दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आयसीसीनेही तयारी सुरू केली होती. क्वालीफाइंग राऊंड सामने मस्कट येथे आयोजित केले जाऊ शकतात. त्यामुळे यूएईची खेळपट्टी तयार करण्यास पुरेसा कालावधी मिळेल, कारण आयपीएलचे उर्वरित ३१ सामने १५ ऑक्टोबरपर्यंत खेळले जातील.