India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत धावांचा पाऊस पाडला आहे. या मालिकेतील पाचव्या कसोटीत भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढला आहे. यासह या संघाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
ओव्हल कसोटीत ओली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले. दरम्यान ८२ धावांचा पल्ला गाठताच भारतीय संघाने एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढला आहे. याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाने ३२७० धावा केल्या होत्या. आता हा विक्रम शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावे आहे.
भारतीय संघाने एकाच मालिकेत केलेल्या सर्वाधिक धावा
भारताचा इंग्लंड दौरा – ३२७२ धावा, २०२५
वेस्ट इंडिजचा भारत दौरा – ३२७० धावा, १८७८-७९
इंग्लंडचा भारत दौरा – ३१४० धावा, २०२४
इंग्लंडचा भारत दौरा – ३११९ धावा, १९६३-६४
याआधी जे विक्रम झाले होते, ते सर्व मायदेशात खेळताना झाले होते. पण आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने हा विक्रम इंग्लंडमध्ये खेळताना करून दाखवला आहे. त्यामुळे हा विक्रम अतिशय खास आहे. भारतीय संघाने १९७८-७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. या मालिकेत सुनील गावसकर यांनी ७३२ धावा केल्या होत्या.
एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने १९८९ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत ३८७७ धक्का केलस होत्या. या मालिकेत हा विक्रम मोडून काढणं जरा कठीण आहे. पण दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला तर हा विक्रम देखील मोडला जाऊ शकतो. आता भारतीय संघ हा विक्रम देखील मोडून काढणा का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.