क्रिकेट सल्लागार समितीशी (सीएसी) चर्चा केल्यानंतर येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात संघाला नवीन प्रशिक्षक मिळणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होणार असून, यामध्ये चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. ७२ दिवसांच्या या दौऱ्यापूर्वी नवीन प्रशिक्षकाची नेमणूक होणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षक निवडीचे सर्वाधिकार सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या सीएसी समितीला दिले आहेत, असेही ठाकूर म्हणाले. ‘‘कोणत्याही संघाला संपूर्ण वेळ प्रशिक्षक मिळणे महत्त्वाचे आहे. हा निर्णय घेण्यासाठी आम्ही जरा वेळ घेतला आणि कदाचित सप्टेंबरमध्ये प्रशिक्षक कोण असेल याची घोषणा करू,’’ अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
‘‘रवी शास्त्री सध्या संघासोबत असून ते संचालक म्हणून काम करत आहेत आणि भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांची चांगली कामगिरी केली आहे. खेळाडूंकडूनही त्यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे जर पूर्णवेळ प्रशिक्षक निवडल्यास शास्त्रींना कोणती जबाबदारी द्यावी, हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. संघासोबत दहा जणांना आम्ही ठेवू शकत नाही,’’ असे स्पष्ट मत ठाकूर यांनी व्यक्त करून नवीन पेच निर्माण केला.
ते म्हणाले, ‘‘शास्त्रींबाबतचा निर्णय सीएसीवर सोपविला आहे आणि त्यांनी ठरवावे संघासोबत किती सदस्य असावेत, किती प्रशिक्षकांची आवश्यकता आहे, गोलंदाजी प्रशिक्षक हवा की फलदांजी प्रशिक्षक किंवा पूर्णवेळ प्रशिक्षक की संचालक, याचा निर्णय सीएसीने घ्यावा.’’