Team India Semi Final Qualification Scenario In ICC Womens ODI World Cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाकडे पहिल्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावून इतिहासाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. या स्पर्धेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने दमदार कामगिरी केली. पहिल्या लढतीत श्रीलंकेला, तर दुसऱ्या लढतीत पाकिस्तानला पराभूत करून भारताने लागोपाठ २ सामने जिंकले. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर कसं आहे, भारतीय संघासाठी सेमीफायनल गाठण्याचं समीकरण? जाणून घ्या.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. पण शेवटच्या ४ षटकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुनरागमन केलं आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडकडून १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या न्यूझीलंड आणि भारतीय संघाविरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार विजयाची नोंद केली आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करणारा भारतीय संघ ४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या पराभवाचा भारतीय संघाला चांगलाच फटका बसला आहे. कारण इथून पुढे सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाला कडवी झुंज मिळणार आहे. १२ ऑक्टोबरला भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. त्यानंतर पुढील सामने न्यझीलंड आणि इंग्लंडसोबत होणार आहे. हे सर्व सामने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत.

भारतीय संघासाठी कसं असेल सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण?

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. पण सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला नाही. भारतीय संघाला इथून पुढे ४ सामने खेळायचे आहेत. हे ४ सामने इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरूद्ध खेळायचे आहेत. भारतीय संघाला जर सहज सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर या ४ पैकी कमीत कमी ३ सामने तरी जिंकावे लागणार आहेत. पण जर असं झालं नाही, तर भारतीय संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.