India vs Pakistan Record In Finals: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. आशिया चषकातील १७ हंमाम आणि ४१ वर्षांनंतर हा योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार, यात काहीच शंका नाही. भारताने या स्पर्धेतील साखळी फेरीतील आणि सुपर ४ फेरीतील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण अंतिम सामन्यात जेव्हा जेव्हा भारत- पाकिस्तान संघ आमनेसामने आले आहेत, तेव्हा पाकिस्तानचं पारडं जड राहिलं आहे. कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
बेंसन एंड हेजेज वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट (१९८५)
बेंसन एंड हेजेज वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. १९८५ मध्ये मेलबर्नच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता.
ऑस्ट्रल-आशिया कप (१९८६)
ऑस्ट्रल-आशिया कप १९८६ स्पर्धेत देखील भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला १ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने दिलेलं २४७ धावांचं आव्हान पाकिस्तानने यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं.
विल्स ट्रॉफी (१९९१)
शारजहाच्या मैदानावर झालेल्या विल्स ट्रॉफी १९९१ स्पर्धेतील अंतिम फेरीतही भारत- पाकिस्तान लढत पाहायला मिळाली. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २६३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव १९० धावांवर आटोपला होता. यासह भारताने हा सामना ७२ धावांनी गमावला होता.
ऑस्ट्रल-आशिया कप (१९९४)
ऑस्ट्रल-आशिया कप १९९४ स्पर्धेत पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद २५० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या २११ धावांवर आटोपला होता.
सिल्व्हर ज्युबिली इंडिपेन्डन्स कप (१९९८)
सिल्व्हर ज्युबिली इंडिपेन्डन्स कप १९९८ स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात मोहम्मद अजहरूद्दीन यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली होती. भारताकडून सौरव गांगुली यांनी १२४ धावांची दमदार शतकी खेळी केली होती.
पेप्सी कप (१९९९)
पेप्सी कप १९९९ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर पाकिस्तानने विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६८ धावांवर आटोपला होता.
कोका-कोला कप (१९९९)
पेप्सी कपनंतर कोका-कोला कप स्पर्धेतील अंतिम सामन्यातही भारत- पाकिस्तान संघांनी धडक दिली होती. या सामन्यात पाकिस्तानचा डाव अवघ्या १२५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारताने हे आव्हान २८ षटकात पूर्ण करत विजय मिळवला होता.
आयसीसी टी-२० वर्ल्ड( २००७)
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ५ धावांनी विजय मिळवला होता.
किटप्लाय कप (२००८)
भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिका पार पडली होती. या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी ३१६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २५ धावा दूर राहिला होता.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१७)
दमदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानने ३३८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताला १५८ धावा करता आल्या.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ १० वेळेस अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. यादरम्यान पाकिस्तानने ७ वेळेस बाजी मारली आहे. तर भारतीय संघाला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे यावेळी भारतीय संघ चौथ्यांदा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.