Sarfaraz Khan Not Selected In Team India Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआयने) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघांमध्ये २० जूनपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी नव्या भारतीय कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिल या दौऱ्यावर भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या दौऱ्यासाठी युवा भारतीय खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर सरफराज खानला या दौऱ्यासाठी संघात भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सरफराज खानला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात तो अन्सोल्ड राहिला. या वेळेचा त्याने पुरेपूर वापर केला आणि आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं. काही दिवसांपूर्वीच त्याने एक फोटो शेअर केला होता, ज्यात तो फिट असल्याचं दिसून आला. सरफराजने इंग्लंड दौऱ्याची तयारी म्हणून १० किलो वजन कमी केलं. यासह दिवसाला ५०० ते ६०० स्विंग होणारे चेंडू खेळून काढले. मात्र, तरीदेखील इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेलं नाही.

सरफराज खानने इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याची बॅट शांत राहिली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धेत अन्सोल्ड राहिल्याने त्याने आपलं संपूर्ण लक्ष फिटनेसवर केंद्रीत केलं.

सरफराज खानला संघात स्थान न मिळण्याचं कारण काय?

इंग्लंड दौऱ्यावर मधल्या फळीत विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडू नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी अनुभवी फलंदाजाची गरज भासणार आहे. त्यामुळे करुण नायर आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ :

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.