Team India Squad For England Tour: आयपीएल २०२५ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेचं वेळापत्रक समोर आलं आहे. मात्र, या दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तसेच रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर संघाला नवा कर्णधार मिळणार आहे.
कोण होणार संघाचा कर्णधार?
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर भारतीय कसोटी संघाला नवा कर्णधार मिळणार हे स्पष्ट झालं आहे. पण ही जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. माध्यमातील वृत्तानुसार, ही जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवली जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
शुबमन गिलसह भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. बुमराहकडे आयपीएल स्पर्धेत नेतृत्वाचा अनुभव नसला तरीदेखील रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वात खेळताना भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. पण, तिन्ही फॉरमॅट खेळत असताना त्याचा वर्कलोड मॅनेज करणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मुख्य निवडकर्ते गौतम गंभीर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या पत्रकार परिषदेत भारताच्या नव्या कसोटी कर्णधाराची देखील घोषणा केली जाणार आहे.
कोण घेणार विराट कोहलीची जागा?
कर्णधारपदासह भारतीय संघासमोर आणखी एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? कारण रोहित शर्मासह विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटला रामराम केलं आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकाची जागा रिकामी आहे. या जागेसाठी तिहेरी शतकी खेळी करणाऱ्या करुण नायरचं नाव तुफान चर्चेत आहे. यासह केएल राहुलचं नाव देखील तुफान चर्चेत आहे. राहुलकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तो मधल्या फळीत टिकून फलंदाजी करू शकतो.
आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी यशस्वी जैस्वाल, नितीश कुमार रेड्डी, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, हर्षित राणा आणि अंशुल कंबोज यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो.