Team India Squad For Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. सर्व संघांनी या स्पर्धेची तयारी देखील सुरू केली आहे. मात्र, भारतीय खेळाडू सध्या विश्रांती घेत आहे. येत्या काही दिवसात या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान कोणाला संधी मिळणार? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या हाती भारतीय संघाची जबाबदारी
रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं आहे. रोहितने निवृत्ती जाहीर केल्यानंतर संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा पाहता आशिया चषक स्पर्धा ही टी-२० फॉरमॅटध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. यासह भारतीय संघासाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल टी-२० संघात पुनरागमन करू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून तो टी-२० संघातून बाहेर आहे. गिलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा डावाची सुरूवात करताना दिसून आले होते. काही दिवसांपूर्वीच अभिषेक शर्माने ट्रॅव्हिस हेडला मागे टाकत आयसीसी टी-२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे त्याला टी-२० संघातून बाहेर करण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र, गिल आल्यानंतर त्याच्या फलंदाजीक्रमात बदल होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी या खेळाडूंची होऊ शकते एन्ट्री
आगामी आशिया चषक स्पर्धेत अभिषेक शर्मा, शुबमन गिलसह संजू सॅमसनलाही संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं जाऊ शकतं. तर ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा या दोघांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर,शिवम दुबे यांना संधी दिली जाऊ शकते.
गोलंदाजीक्रम मजबूत करण्यासाठी भारतीय संघात वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते. तर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील आशिया चषक स्पर्धा खेळताना दिसून येऊ शकतो. बुमराह टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर एकही टी-२० सामना खेळताना दिसून आलेला नाही. आता आगामी टी-२० विश्वचषक पाहता बुमराहला संधी दिली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुख्य बाब म्हणजे, यशस्वी जैस्वाल आणि दुखापतीमुळे बाहेर असलेल्या ऋषभ पंत यांना या संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
या स्पर्धेसाठी असा असू शकतो भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा/ प्रसिध कृष्णा, जितेश शर्मा/ध्रुव जुरेल.