भारताचा इंग्लंड दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहते निराश झाले होते. आता हा सामना कधी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. अशा परिस्थितीत आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीच्या जागी २०२२मध्ये भारत इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळेल.

क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यात पुढील वर्षी एक कसोटी सामना खेळण्यासाठी करार झाला आहे. भारतीय संघाला पुढील वर्षी एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करायचा आहे आणि त्या दरम्यान हा कसोटी सामनाही खेळला जाईल.

बीसीसीआय आणि ईसीबीने सहमती दर्शवली आहे, की पुढील वर्षी मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान या कसोटी सामन्यासाठी वेळ ठरवली जाईल. दोन्ही मंडळांनी अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर, हा सामना सध्याच्या मालिकेचा भाग असेल किंवा तो मालिकेपासून वेगळा ठेवला जाईल की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मालिकेचा निकाल देखील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

हेही वाचा – “पाकिस्तानची चांगली रणनीती स्वीकारून भारतानं आपली चांगली टीम तयार केलीय”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटीपर्यंत भारतीय संघ २-१ने आघाडीवर होता, परंतु या काळात भारतीय शिबिरात करोना संसर्गाची प्रकरणे येऊ लागली. चौथ्या कसोटीच्या मध्यातच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचे इतर सदस्य संक्रमित झाले. त्याचवेळी, १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या शेवटच्या कसोटीच्या एक दिवस आधी संघाच्या फिजिओला संसर्ग झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी शेवटची कसोटी खेळण्यास नकार दिला. यानंतर, सामना सुरू होण्याच्या सुमारे दोन तास आधी तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.