ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होऊ लागले तरी कसोटी क्रिकेट हेच शिखर असावे, याची खातरजमा क्रिकेट प्रशासकांनी करण्याची गरज आहे, असे मत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.
मन्सूर अली खान पतौडी स्मृती व्याख्यानमालेत गावस्कर म्हणाले, ‘‘कसोटी क्रिकेटला नवी झळाळी देण्याचे काम क्रिकेट प्रशासकांचे आहे. कसोटी खेळणाऱ्या दहा देशांपैकी फक्त चार ते पाच बलाढय़ संघांनाच कसोटी क्रिकेटविषयी नितांत प्रेम असल्याचे दिसून येते. त्यामुळेच क्रिकेट प्रशासकांनी त्यात लक्ष घालण्याची गरज आहे.’’
या व्याख्यानमालेला पतौडी यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहू शकला नसला तरी गावस्कर यांनी पतौडींविषयीच्या अनेक घटना आणि त्यांचे व्यक्तिमत्व या कार्यक्रमात सर्वासमोर उलगडले. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित होते.