एक्स्प्रेस वृत्त/पीटीआय

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या संक्रमणाच्या दीर्घ प्रवासाला आता सुरुवात होणार असून ‘बीसीसीआय’ची निवड समिती आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी युवकांवर भर असलेल्या संघाची आज, शनिवारी घोषणा करणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून शुभमन गिलला पसंती मिळणार हे जवळपास निश्चित आहे. तसेच अनुभवी मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीची पूर्ण खात्री नसल्याने अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समिती डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्रथमच कसोटी संघात संधी देण्याबाबत विचार करत असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच रोहित आणि विराट कोहली या तारांकितांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय संघाला आता संक्रमणातून जावे लागणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये २० जूनपासून पाच कसोटी सामने खेळणार आहे.

भारतीय संघाने अखेरची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. त्यावेळी जसप्रीत बुमराने उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. या दौऱ्यात त्याने दोन सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्वही केले. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटीत बुमराच्या पाठीला दुखापत झाली. आता पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी बुमराला इंग्लंडविरुद्ध पाचपैकी केवळ तीन किंवा अधिकाधिक चार सामने खेळविण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. निवड समिती आणि ‘बीसीसीआय’ला पाचही सामन्यांत खेळू शकेल असा कर्णधार हवा असल्याने गिलला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

तंदुरुस्तीची चिंता

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे कसोटी संघात पुनरागमन होईल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात शमी एका दिवसात १० हून अधिक षटकांचे दीर्घ ‘स्पेल’ टाकू शकेल याची निवड समितीला शाश्वती नाही. ‘बीसीसीआय’च्या वैद्याकीय पथकाकडून अशाप्रकारची माहिती त्यांना देण्यात आली आहे. त्यातच बुमरालाही एक-दोन सामन्यांत विश्रांती द्यावी लागणार असल्याने निवड समिती सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल अशाच वेगवान गोलंदाजांना पसंती देणार समजते. शमीऐवजी डावखुरा अर्शदीप सिंग किंवा हरियाणाचा अंशुल कम्बोज या युवा वेगवान गोलंदाजांचा कसोटी संघात समावेश करण्याबाबत निवड समिती विचारधीन आहे.

कौंटीतील अनुभवाचा फायदा?

● डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला कौंटी क्रिकेटमधील अनुभवाचा यावेळी फायदा मिळू शकेल. इंग्लंडमधील कौंटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३ च्या हंगामात त्याने केंट संघाचे प्रतिनिधित्व करताना पाच सामन्यांत १३ गडी बाद केले होते.

● तसेच गेल्या हंगामात रणजी आणि लाल चेंडूने होणाऱ्या अन्य देशांतर्गत स्पर्धांत अर्शदीपने सहभाग नोंदवला. अर्शदीपमधील चेंडू स्विंग करण्याची क्षमता, तसेच अन्य सर्वच वेगवान गोलंदाज उजव्या हाताने चेंडू टाकणारे असताना अर्शदीपचे डावखुरेपणही भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल.

मधल्या फळीसाठी करुण, सुदर्शनची दावेदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहितच्या निवृत्तीमुळे केएल राहुल आता मधल्या फळीऐवजी सलामीला खेळणार हे जवळपास निश्चित आहे. त्यातच कोहलीनेही कसोटीला अलविदा केल्याने मधल्या फळीतील दोन स्थाने रिक्त झाली आहेत. या स्थानांसाठी करुण नायर, साई सुदर्शन, सर्फराज खान, श्रेयस अय्यर आणि देवदत्त पडिक्कल हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. यापैकी साई सुदर्शनची निवड जवळपास निश्चित आहे. तसेच गेल्या दोन रणजी हंगामांत विदर्भाकडून खोऱ्याने धावा करणाऱ्या करुणचे आठ वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन होऊ शकेल. करुण आणि सुदर्शन या दोघांनाही कौंटी क्रिकेटचा अनुभव आहे.