Aslam Inamdar Journey From Villege To Pro Kabaddi: यश कोणालाच सहज मिळत नाही. त्यासाठी दिवसरात्र एक करावे लागतात. कबड्डीच्या खेळ काय शिकवतो? तर एकदा बाद होऊन बाहेर झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मैदानात येण्याची संधी मिळते. बरेचशे खेळाडू असे आहेत जे कबड्डीत कारकिर्द घडवायची म्हणून मैदानात उतरले पण सर्वांनाच यश मिळेल असं नाही. पण जर मेहनत आणि जिद्द असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून पुढे जाता येतं हे महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारने दाखवून दिलं आहे.

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटनला दहाव्या हंगामाचं जेतेपद मिळवून देणाऱ्या अस्लम इनामदारला मुंबईत नवी ओळख मिळाली. पण त्याच्या कबड्डीची सुरुवात महाराष्ट्रातील अहिल्यानगर भागातील टाकळीभान नावाच्या छोट्या गावातून झाली. २०११ मध्ये अस्लम इनामदारच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्याची आई जाकीरा मुस्तफा यांच्यावर होती. काबाडकष्टाची कामं करून त्यांनी अस्लम इनामदार आणि त्याचा मोठा भाऊ वसीमला घडविण्यात मोलाची भूमिका बजावली.

अस्लम इनामदारला आपल्या मोठ्या भावाकडे पाहून कबड्डी खेळण्याची आवड निर्माण झाली. मोठा भाऊ वसीम पिशवीत कपडे घेऊन कबड्डीचा सराव करण्यासाठी जात असे. स्थानिक कबड्डी स्पर्धांमध्ये त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला होता. त्याला पाहून अस्लमला देखील कबड्डी खेळायची आवड निर्माण झाली. मोठा भाऊ उत्तम कबड्डीपटू असल्याने अस्लम इनामदारला कबड्डीतील डावपेच शिकून घेणं सोपं झालं. संध्याकाळी कबड्डीचा सराव आणि दिवसा चहाच्या टपरीवर किंवा शेतात मिळेल ते काम केलं. कबड्डी आणि घर सांभाळणं या दोन्ही गोष्टी त्याला जमू लागल्या होत्या.

पण कबड्डीत काहीतरी मोठं करायचं तर त्याला मुंबई गाठणं गरजेचं होतं. अस्लमच्या कबड्डी कारकिर्दीला खरं वळण मिळालं ते मुंबईत येऊन. त्याला ठाणे जिल्ह्यातील वासिंद गावात राहणाऱ्या राजू कथोरेची साथ मिळाली. या जगात अनोळखी व्यक्तीला कोणी दोन दिवस सुद्धा घरात ठेवायला विचार करेल. पण राजू कथोरे आणि त्याच्या कुटुंबाने अस्लमला आपल्या घरात ठेऊन घेतलं. स्थानिक कबड्डी क्लब जय बजरंग वासिंद संघाकडून त्याला खेळण्याची संधी मिळत गेली. याच क्लबकडून खेळताना त्याला राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर एअर इंडिया आणि युवा पलटन सारख्या व्यावसायिक संघाची नजर अस्लम इनामदारवर पडली.

प्रो कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटनकडून खेळताना अस्लम इनामदार आणखी मोठा हिरो झाला. प्रो कबड्डी स्पर्धा गाजवणाऱ्या अस्लमचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. पण अस्लम कोणाला आपला आदर्श मानतो? असा प्रश्न विचारला असता, अतिशय नम्रपणे उत्तर देत तो म्हणाला, “मी माझ्या आईला आदर्श मानतो. मला माझ्या आईने एकच सांगितलं होतं की, कोणी कोणाला मदत करणार नाही. तुम्हाला दोन हात आणि दोन पाय दिले आहेत. त्याचा योग्य वापर करा आणि सातत्याने मेहनत करा. जे काही आहे ते माझ्या आईच्या आशिर्वादामुळेच आहे.” असं तो अभिमानाने म्हणाला.

प्रो कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटन संघाचं नेतृत्व करत असलेल्या अस्लम इनामदारने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतानाही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचा तो भाग होता. अशीच कामगिरी यापुढेही सुरू ठेवली तर लवकरच तो भारतीय संघाचा कर्णधार देखील बनू शकतो.