आगामी टी२० विश्वचषकासाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने जाहीर केलेल्या यादीत केवळ एका भारतीय पंचाला स्थान मिळाले आहे. आता टी२० विश्वचषक सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, आयसीसी देखील तयारीमध्ये व्यस्त असून गुरुवारी, विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व पंचांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत फक्त एका भारतीय पंचांचे नाव समाविष्ट आहे.
नितीन मेनन हे आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग आहेत, जे टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. या स्पर्धेत तब्बल १६ पंचांच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. एका निवेदनात आयसीसीने म्हटले की, “एकूण १६ पंच स्पर्धेत पंचाची भूमिका पार पाडतील. जेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता, तेव्हा रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, कुमार धर्मसेना आणि मराईस इरास्मस यांनी २०२१च्या अंतिम सामन्यात पंचाची भूमिका पार पाडली होती.”
आयसीसी सामना अधिकाऱ्यांच्या पॅनेलचे मुख्य सामना अधिकारी रंजन मदुगले हेदेखील चार माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी एक आहेत, जे सामना अधिकारी असतील. यामध्ये मदुगले यांच्यासोबत झिम्बाब्वेचे एँड्र्यू पायक्रॉफ्ट, इंग्लंडचे ख्रिस्तोफर ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून यांचा समावेश आहे.
टी२० विश्वचषक मध्ये भारत-पाकिस्तान २३ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी रॉड टकर आणि मराइस इरास्मस हे मैदानावरील पंच असतील. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी आयसीसीने सात शहरांचा समावेश केला आहे. त्यात अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी ही शहरे असून यामध्ये सामने होणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हेही वाचा : ॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट! जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…
पंच यादी
एड्रियन होल्डस्टॉक, अलीम डार, अहसान रजा, क्रिस्टोफर ब्राउन, क्रिस्टोफर गफानी, जोएल विल्सन, कुमारा धर्मसेना, लँग्टन रुसेरे , मरॅस इरास्मस, माइकल गफ, नितिन मेनन, पॉल रीफेल, पॉल विल्सन, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, रॉडनी टकर.