पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या सुमार खेळीबद्दल त्याने आयपीएलला जबाबदार धरलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघासमोर हार पत्करावी लागली होती. त्याबद्दल अनेक क्रिकेटपटू तसंच क्रीडातज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमनेही याबद्दल भाष्य केलं आहे.

वसीम अक्रमने सांगितलं की, भारतीय संघ आयपीएलला खूप जास्त महत्त्व देत आहेत आणि त्यांना वाटतं की आयपीएल आपल्यासाठी पुरेसं आहे. वसीम अक्रमच्या मते भारतीय खेळाडू इंटरनॅशनल मालिकेला फारसं महत्त्व देताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना यंदाच्या टी-२० वर्ल्डकपदरम्यान संघर्ष करावा लागत आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “हे सर्व पैशांसाठी” ; न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे संतापले चाहते; IPLवर बंदी घालण्याची मागणी

भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडून हार पत्करावी लागली. या सामन्यांच्या दरम्यान भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही अगदी सामान्यच होती. भारतीय संघ या दोन्ही सामन्यांच्या दरम्यान फारशी आकर्षक खेळी करु शकला नाही.

टी २० विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा आठ विकेट्सने पराभव केला. टी-२० विश्वचषकातील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग आता खूपच कठीण झाला आहे. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी या पराभवाचे खापर इंडियन प्रीमियर लीगवर फोडले आहे. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

भारतीय संघाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर #BANIPL मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. आयपीएल १४ चा दुसरा टप्पाही यूएईमध्ये खेळवला गेला होता. त्यानंतर लगेचच टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात झाली. भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलला जास्त महत्त्व देत असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाहीत आणि थकलेले दिसत आहेत, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.