Tilak Varma Century on County Debut: भारत वि. इंग्लंड कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजांनी एकामागून एक शतकं झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यादरम्यान भारताचा विस्फोटक फलंदाज तिलक वर्मानेही इंग्लंडमध्ये शतक झळकावलं आहे. तिलक भारताच्या इंग्लंड दौऱ्याचा भाग नसून तो काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचला आहे. काऊंटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतकी खेळी केली.

तिलकने त्याचा काउंटी संघ हॅम्पशायरसाठी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून आपला फॉर्म दाखवून दिला. हॅम्पशायरकडून खेळणाऱ्या भारतीय फलंदाज तिलक वर्माने एसेक्सविरुद्ध काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पणात शतक झळकावले. सोमवारी दिवसअखेर तिलक वर्मा ९८ धावांवर नाबाद माघारी परतला होता. यानंतर, मंगळवारी तो फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने आणखी दोन धावा काढून आपले शतक पूर्ण केले. तिलक वर्माने २३९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

तिलक वर्माला आतापर्यंत कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो टी-२० क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्त्व करतो. तिलकचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे सहावे शतक आहे. तिलक वर्मा काउंटीमध्ये त्याचा पहिला सामना खेळत होता आणि त्याच सामन्यात त्याने त्याचे शतक पूर्ण केलं.

तिलक वर्माने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादसाठी तीन शतकं, न्यूझीलंड अ विरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना एक शतक आणि गेल्या वर्षी दुलीप ट्रॉफीमध्ये एक शतक झळकावले आहे. त्याने २०१९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तिलक वर्मा काऊंटीमध्ये हॅम्पशायर संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि १०० धावा करत बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान तीन षटकार आणि ११ चौकार लगावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिलक वर्मा टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा कमालीचा फलंदाज आहे. तो आयसीसी टी-२० क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्या पुढे फक्त अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड आहेत.