निर्भेळ यशाविषयी कोहलीची स्पष्टोक्ती
रांची : समोरील प्रतिस्पर्धी कोणताही असो, परंतु प्रामाणिकपणे प्रत्येक खेळाडूने आपले कर्तव्य निभावल्यामुळेच भारतीय संघ आज यशांची शिखरे सर करत आहे, अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच आफ्रिकेला कसोटी मालिकेत ३-० अशी धूळ चारली.
‘‘जोपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे संघभावनेशी एकनिष्ठ राहून आमचे कर्तव्य बजावत राहू, तोपर्यंत असे अनेक विजय सहज आमच्या पदरी पडतील. विश्वात सर्वोत्कृष्ट कसोटी संघ बनण्याच्या दिशेनेच आम्ही २०१४ मध्ये सुरुवात केली होती. ते स्वप्न आता साकार होत असल्याने निश्चितच फार समाधानी वाटत आहे,’’ असे कोहली सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
‘‘सध्याच्या संघातील प्रत्येक खेळाडूत सामना जिंकवण्याची क्षमता आहे. विशेषत: खेळपट्टय़ांवर निर्भर राहण्याची प्रथा आम्ही मोडीत काढली असून स्वत:च्या कामगिरीद्वारे अनुकूल निकाल मिळवले आहेत. रोहित, मयांक, नदीम यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले, तर गोलंदाजांनी मला कधीच निराश केले नाही. त्यामुळेच कर्णधार म्हणून या संघाचा मला अभिमान वाटतो. परदेशातील दौऱ्यांवरही आम्ही अशीच कामगिरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू,’’ असेही ३० वर्षीय कोहलीने सांगितले.
याव्यतिरिक्त भारतात कोणत्याही पाचच ठिकाणी कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात यावे, याकडे कोहलीने लक्ष वेधले. ‘‘कसोटी हा क्रिकेटचा मुख्य प्रकार असून भारतात जर कसोटी सामन्यांसाठी चाहत्यांना स्टेडियमकडे वळवायचे असेल, तर कोणतेही पाच ठिकाण ठरवून तेथेच सामन्यांचे आयोजन करणे आवश्यक आहे. आपल्या देशात असे पाच स्टेडियम नक्कीच आहेत, जेथे कसोटी सामन्यांसाठी चाहते मोठय़ा प्रमाणावर येतील,’’ असेही कोहलीने सांगितले.
गांगुली यांनी धोनीविषयी अद्याप संपर्क साधलेला नाही!
गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटमधून विश्रांती घेणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही, असेही कोहली म्हणाला.
‘‘गांगुली हे लवकरच ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन. तूर्तास तरी धोनीविषयी आमच्यात काहीही संवाद झालेला नाही. त्यामुळे गांगुली यांचा आदेश आल्यावर मी स्वत: जाऊन याविषयी चर्चा करेन,’’ असे कोहली म्हणाला.
१३ सर्वाधिक १३ कसोटी मालिका जिंकणारा कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याशिवाय भारताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिकेविरुद्ध निर्भेळ यश संपादन केले.
११ घरच्या मैदानावर भारताने सलग ११वा मालिका विजय साकारला. २०१३ पासून भारताची ही विजयाची मालिका कायम आहे.
८३ तब्बल ८३ वर्षांनंतर आफ्रिकेला एकाच मालिकेत सलग दोन वेळा एक डावाने पराभव पत्करावा लागला.