Ravichandran Ashwin 100th Test Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी गुरुवार, ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाणार आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसाठी हा कसोटी सामना खास आहे. कारण हा त्याचा १०० वा कसोटी सामना असणार आहे. याआधी माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी दिग्गज फिरकीपटूवर मोठा आरोप केला आहे. यापूर्वीही त्यांना भारताचा ऑफस्पिनर अश्विनवर टीका केली होती. माजी लेगस्पिनर शिवरामकृष्णन यांनी दावा केला आहे की, अश्विनला त्याच्या ​​१०० व्या कसोटी सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या कॉल आणि संदेशांना प्रतिसाद दिला नाही.

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी एक्सवर लिहिले, “अश्विनला त्याच्या १०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा देण्यासाठी त्याला अनेक वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने माझा फोन कट केला. त्यानंतर मी त्याला मेसेज केला असता, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. हाच सन्मान आम्हा माजी क्रिकेटपटूंना मिळतो. आदर सुसंस्कृत लोकांकडूनच होतो. तसेच, यापूर्वी मी त्याच्या अॅक्शनमध्ये किंचित सुधारणा करण्याबद्दल ट्विट करत होतो आणि त्याच्यावर टीका करत नव्हतो. लोकांना माझी भावना समजेल, अशी आशा आहे.”

अश्विनबद्दल केलेल्या ट्विटवर काही युजर्सने माजी दिग्गजाला पाठिंबा दिला, तर काहींनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. शिवरामकृष्णन यांनी ट्रोलर्सना प्रश्न विचारला की, तुम्ही भारतासाठी किती सामने खेळला आहात? अनुभव आहे का? त्यांनी ट्विट केले आणि म्हटले, “तुम्ही सर्व माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळलात का, ९ कसोटी १६ वनडे?” शिवरामकृष्णन यांनी यापूर्वी अश्विनच्या गोलंदाजीवर टीका केली होती आणि सेना देशांमध्ये विकेट घेण्याच्या त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

हेही वाचा – Neil Wagner : “निवृत्तीसाठी कोणावरही दबाव टाकला गेला नाही…”, रॉस टेलरच्या विधानावर केन विल्यमसनचे प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविचंद्रन अश्विनचा १००वा कसोटी सामना –

रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. धरमशाला येथील इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना त्यांच्या १००वा कसोटी सामना असणार आहे. त्याने विदेशात ९९ पैकी ३९ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने १४९ विकेट घेतल्या आहेत. घरच्या मैदानावर ५९ कसोटी सामन्यांमध्ये त्याचे ३५४ विकेट्स आहेत. अश्विनची विदेशात सरासरी ३०.४० आहे. अश्विनने नुकतेच कसोटी कारकार्दीत ५०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. भारतासाठी ही कामगिरी करणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी कुंबळेने ही कामगिरी केली होती. माजी भारतीय कर्णधाराच्या नावावर ६१९ विकेट्स आहेत. अश्विन हळूहळू त्याच्या विक्रमाच्या जवळ जात आहे.