वृत्तसंस्था, ब्रिजटाऊन (बार्बाडोस)

जितका मोठा सामना, जितके अधिक दडपण, तितकाच विराट कोहलीचा खेळ बहरतो असे म्हटले जाते. आता आपल्या अलौकिक गुणवत्तेची प्रचीती देण्याची कोहलीला पुन्हा संधी मिळणार आहे. भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल आठ’ फेरीत आज, गुरुवारी अफगाणिस्तानशी सामना खेळणार असून यात विजय मिळवायचा झाल्यास कोहलीने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या रचनेबद्दल बरीच चर्चा रंगते आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील सर्व साखळी सामने अमेरिकेत खेळले. तेथील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होत्या. त्यामुळे भारताने जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज अशा तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या साथीला हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे हे वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलूही होते. मात्र, आता बाद फेरीचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. येथील खेळपट्ट्यांकडून फिरकीला मदत मिळणे अपेक्षित आहे. या परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी भारतीय संघ चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संघात स्थान देण्याबाबत विचार करू शकेल. कुलदीपला संधी द्यायची झाल्यास सिराजला संघाबाहेर बसावे लागू शकेल. तसेच सुरुवातीच्या षटकांत वाऱ्यामुळे चेंडू स्विंग होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>>T20 World Cup: केन विल्यमसनने देशासाठी खेळणं का सोडलं?

दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या संघाने यंदाच्या स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. त्यांनी युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघांवर मोठे विजय मिळवले. अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजकडून १०४ धावांनी पराभव पत्करावा लागला. असे असले तरी अफगाणिस्तानचे खेळाडू चांगल्या मन:स्थितीत असतील. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या तीन सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु विंडीजने, त्यातही निकोलस पूरनने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केले. आता भारताच्या अनुभवी फलंदाजांसमोर त्यांची कसोटी लागणार आहे. मात्र, अफगाणिस्तानमधील धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता लक्षात घेता, त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.

रशीद, गुरबाझवर भिस्त

अफगाणिस्तानने आपले साखळी सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले. या अनुभवाचा त्यांना आता फायदा होऊ शकेल. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमनुल्ला गुरबाझने (१६७) केल्या आहेत. त्याला सलामीचा साथीदार इब्राहिम झादरानची (१५२ धावा) चांगली साथ मिळते आहे. मधल्या फळीतील फलंदाजांनी मात्र कामगिरीत सुधारणा करणे आवश्यक आहे. गोलंदाजी ही कायमच अफगाणिस्तानची भक्कम बाजू राहिली आहे. लेग-स्पिनर रशीद खान, ऑफ-स्पिनर मोहम्मद नबी, चायनामन फिरकीपटू नूर अहमद, डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फरुकी आणि नवीन-उल-हक या सर्वांना ‘आयपीएल’मध्ये खेळण्याचा अनुभव आहे.

मोठ्या सलामीची आवश्यकता

न्यूयॉर्क येथे झालेल्या साखळी फेरीतील सामन्यांत कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा या भारताच्या सलामीवीरांना धावांसाठी झगडावे लागले. मात्र, आता या दोघांकडून भारताला मोठ्या सलामीची अपेक्षा असेल. कोहलीने ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी झालेल्या ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. परंतु विश्वचषकातील तीन सामन्यांत त्याला अनुक्रमे १, ४, ० धावाच करता आल्या आहेत. आता कॅरेबियन बेटांवरील मैदानांवर फलंदाजी करणे थोडे कमी आव्हानात्मक असेल असा अंदाज आहे. त्यामुळे कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा बाळगली जात आहे. मधल्या फळीत ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यावर भारताची भिस्त असेल. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूंनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

● वेळ : रात्री ८ वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, , १ हिंदी, हॉटस्टार अॅप