World Para Athletics Championships: दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यात काही तोडगा निघाला नव्हता. भटक्या कुत्र्यांमुळे जागतिक स्तरावर मान खाली घालण्याचा प्रसंग उद्भवला आहे. दिल्लीत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू आहे. या स्पर्धेच्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये केनिया आणि जपानमधील प्रशिक्षकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या दोन्ही प्रशिक्षकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे म्हटले जाते.
१२ व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी नवी दिल्लीत आलेले केनियाचे स्प्रिंट प्रशिक्षक डेनिस म्वांझो आणि जपानचे सहाय्यक प्रशिक्षक मीको ओकुमात्सु यांना शुक्रवारी सकाळी जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या सराव ट्रॅकवर भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.
केनियाच्या संघाचे डॉक्टर मायकेल ओकारो यांनी द इंडियन एक्सप्रेसशी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, कुत्र्यांच्या चाव्याची घटना चिंतेचे लक्षण आहे.
ओकारो पुढे म्हणाले, “ही घटना सकाळी ९.३० वाजता घडली. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर डेनिस यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना रेबिजची लस देण्यात आली. जागितक चॅम्पियनशिप स्पर्धेत अशा घटना घडणे ही गंभीर गोष्ट आहे. आम्हाला डेनिसची काळजी वाटते.”
जपानचे सहाय्यक प्रशिक्षक मीको ओकुमात्सु यांनाही सकाळी सराव सत्र सुरू असताना कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सुदैवाने वैद्यकीय पथकाने माझ्यावर लवकर उपचार केले असे ओकुमात्सु म्हणाले.
इंडियन ऑईल जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या आयोजकांनी सदर प्रकरणावर निवेदन दिले आहे. स्पर्धेच्या ठिकाणी काही लोक भटक्या कुत्र्यांना अन्न देत असल्यामुळे सदरची घटना घडली असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
जागतिक पॅरा स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन
२०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारत बोली लावत असताना यंदा पहिल्यांदाच भारतात पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले गेले. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या जागतिक स्पर्धेत १०४ देशांमधील १,२०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा कहर वाढला
यावर्षाच्या सुरुवातील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये दिल्लीत २५,२१० कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदविल्या गेल्या. त्याच्याआधीच्या वर्षात हेच प्रमाण १७,८४७ इतके होते. यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात दिल्लीत कुत्र्याने चावा घेतल्याच्या जवळपास ३,२०० घटना नोंदवल्या गेल्या. दिल्लीत भटक्या कुत्र्यांची संख्या ८ लाख असल्याचे सांगितले जाते.
शुक्रवारच्या घटनेनंतर आता दिल्ली महानगरपालिकेने स्पर्धेच्या ठिकाणी कुत्रे पकडण्यासाठी दोन पूर्णवेळ पथके तैनात केली आहेत. भटक्या कुत्र्यांना लवकर पकडून त्यांना आश्रयगृहात पाठविण्यासाठी इतर वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.