लंडन : भरपाई वेळेत अखेरच्या क्षणी कर्णधार व्हर्जिल व्हॅन डाईकने हेडरच्या साहाय्याने साकारलेल्या निर्णायक गोलमुळे लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये विजयी सलामी देताना अॅटलेटिको माद्रिदवर ३-२ अशी मात केली. गतविजेत्या पॅरिस सेंट-जर्मेन, तसेच बायर्न म्युनिक या संघांनीही मोहिमेची यशस्वी सुरुवात केली.
घरच्या मैदानावर खेळत असलेल्या लिव्हरपूलने अँड्रयू रॉबर्टसन (चौथ्या मिनिटाला) आणि मोहम्मद सलाह (सहाव्या मि.) यांच्या गोलमुळे सुरुवातीलाच २-० अशी आघाडी घेतली. परंतु अॅटलेटिकोकडून मार्कस लॉरेंटेने पूर्वार्धातील भरपाई वेळ आणि उत्तरार्धात एकेक गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. अखेर ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला डॉमिनिक सोबोझलाइच्या कॉर्नर किकवर व्हॅन डाईकने हेडर मारून गोल करत लिव्हरपूलला आघाडी मिळवून दिली. अखेर त्याचा गोलच निर्णायक ठरला.
अन्य लढतीत, पॅरिस सेंट-जर्मेनने अॅटलांटा संघावर ४-० असा विजय मिळवला. तिसऱ्याच मिनिटाला मार्किनयोसने गोल करत सेंट-जर्मेनला आघाडी मिळवून दिली. यानंतर खविचा क्वारात्सखेलियाने (३९व्या मि.) संघाचा दुसरा गोल नोंदवला. उत्तरार्धात नुनो मेंडेस आणि गोन्सालो रामोस यांनी गोल करत सेंट-जर्मेनला मोठा विजय मिळवून दिला.
बायर्न म्युनिकने चेल्सीवर ३-१ अशी सरशी साधली. म्युनिककडून हॅरी केनने दोन गोल नोंदवले. दुसरीकडे, मार्कस थुरमच्या दोन गोलमुळे इंटर मिलानने आयेक्सला २-० असे नमविले.