scorecardresearch

अल्टिमेट खो-खो लीग : मुंबई खिलाडीजचा पहिला विजय; राजस्थान वॉरियर्सवर मात; ओडिशा जगरनॉट्सचीही बाजी

अखेरच्या सात मिनिटांत मुंबईच्या संघाने १८ गुण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

अल्टिमेट खो-खो लीग : मुंबई खिलाडीजचा पहिला विजय; राजस्थान वॉरियर्सवर मात; ओडिशा जगरनॉट्सचीही बाजी
मुंबईच्या संघाने १८ गुण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पुणे : बचावपटूंनी केलेल्या निर्णायक कामगिरीच्या जोरावर मुंबई खिलाडीज संघाने सोमवारी राजस्थान वॉरियर्सचा ५१-४३ असा आठ गुणांनी पराभव करत अल्टिमेट खो-खो स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात मुंबईला विजयासाठी झुंजावे लागले. मुंबईच्या विजयात त्यांच्या बचावपटूंची महत्त्वाचे योगदान दिले. त्याचबरोबर मुंबईच्या गजानन सेनगलचे आक्रमण निर्णायक ठरले. त्याने पोलवरती अचूक कामगिरी करताना १६ गुणांची कमाई केली. कर्णधार विजय हजारे, रोहन कोरे यांनीही संघासाठी गुण मिळवले. विश्रांतीला मुंबई संघाने २९-२० अशी मिळवलेली नऊ गुणांची आघाडी महत्त्वाची ठरली. विश्रांतीनंतर राजस्थानच्या संघाने आक्रमणात २१ गुणांची कमाई करत ४१-३३ अशी आघाडी घेतली. यावेळी मुंबईला बचावाचे चार गुण मिळाले. अखेरच्या सात मिनिटांत मुंबईच्या संघाने १८ गुण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

दुसऱ्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने चेन्नई क्विक गन्सवर ५१-४३ अशा फरकाने मात केली. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली, पण निर्णायक क्षणी खेळ उंचावत ओडिशाने बाजी मारली. ओडिशाकडून महेशा पी. याने आक्रमणात, तर दिलीप खांडवीने बचावत चुणूक दाखवली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या