Vaibhav Suryavanshi Second Fastest IPL Hundred History : भारताचा मास्टर ब्लास्टर आणि अवघ्या क्रिकेटजगताच्या गळ्यातला ताईत झालेला सचिन तेंडुलकर यानं १६व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर घडलेल्या मास्टर ब्लास्टरच्या कारकिर्दीचे आपण सगळेच साक्षीदार आहोत. पण वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी अवघ्या क्रिकेटविश्वाला तोंडात बोटं घालायला लावणारी खेळी करणारा वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात वैभवनं ही संस्मरणीय खेळी साकारली. यानंतर खुद्द मास्टर ब्लास्टरनं त्याच्या खेळीची भन्नाट रेसिपी सांगितली आहे.
सोमवारच्या सामन्यात गुजरातनं राजस्थानला विजयासाठी तब्बल २१० धावांचं आव्हान दिलं होतं. मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, राशिद खान अशा दिग्गजांसमोर हे आव्हान राजस्थानला पूर्ण करणं अवघड दिसत होतं. पण वैभव सूर्यवंशीनं या दिग्गज गोलंदाजीची अक्षरश: पिसं काढली. फक्त ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावत वैभव अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा फलंदाज ठरला आहे. ख्रिस गेल ३० चेंडूंमध्ये शतकासह पहिल्या स्थानी आहे. वैभवनं आपल्या खेळीत तब्बल ११ षटकार व ७ चौकार लगावले.
वैभवच्या अद्भुत खेळीची रेसिपी!
दरम्यान, वैभव सूर्यवंशीच्या या दिमाखदार खेळीनंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याचं कौतुक केलं आहे. सचिननं एक पोस्ट त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वैभवनं राशीद खानच्या गोलंदाजीवर षटकार खेचून शतक साजरं केलं तो व्हिडिओ सचिननं शेअर केला आहे.
“वैभवची खेळण्याची निडर पद्धत, फटका मारतानाचा बॅटचा वेग, चेंडूचा टप्पा लवकर ओळखणं आणि चेंडूच्या मागे आपली संपूर्ण ताकद एकवटणं ही वैभवच्या या भन्नाट खेळीची रेसिपी होती. परिणाम… ३८ चेंडूंमध्ये १०१ धावा! मस्त खेळलास”, अशी पोस्ट सचिन तेंडुलकरनं शेअर केली आहे.
वैभवची भावनिक प्रतिक्रिया, पण अकाऊंट फेक?
दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या या पोस्टवर वैभव सूर्यवंशी नावाच्या एका अकाऊंटवरून आभार मानण्यात आले आहेत. मात्र, हे अकाऊंट वैभव सूर्यवंशीचं नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. हे एक फेक अकाऊंट असून त्यावरून सचिन तेंडुलकरच्या अकाऊंटवरील पोस्टचे आभार मानण्यात आल्याचं बोललं जात आहे.
“खूप खूप धन्यवाद सर. ज्या व्यक्तीकडे मी माझा आदर्श म्हणून पाहतो, अशा व्यक्तीकडून कौतुकाची थाप मिळवणं हे माझं स्वप्न होतं. मला झालेला आनंद मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही”, अशी पोस्ट या अकाऊंटवर करण्यात आली आहे. मात्र, हे वैभव सूर्यवंशीचं फेक अकाऊंट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.