वृत्तसंस्था, मुंबई

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दोनही विजय तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत मिळविणे हा निव्वळ योगायोग होता. केवळ दोन सामने जिंकले म्हणून बुमराचे कसोटी संघातील महत्त्व कमी होत नाही. त्याच्यातील गुणवत्ता अविश्वसनीय असून असा गोलंदाज तुम्हाला हवा असतो, असे मत भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

अननुभवी भारतीय संघाने नुकतीच झालेली इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. बुमराने या मालिकेतील केवळ तीन सामने खेळले. यापैकी दोन सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला, तर एक सामना अनिर्णित राहिला. बुमराच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने उर्वरित दोनही सामने जिंकले. या सामन्यांत मोहम्मद सिराजने अतिरिक्त जबाबदारी घेताना उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याला प्रसिध कृष्णा आणि आकाश दीप या अन्य वेगवान गोलंदाजांची मोलाची साथ लाभली. कार्यभार व्यवस्थापनांतर्गत बुमरा या मालिकेत केवळ तीन सामने खेळणार हे आधीच ठरले होते. असे असले तरी ओव्हल येथे झालेल्या निर्णायक अखेरच्या कसोटीत बुमराने खेळले पाहिजे होते असा मतप्रवाह होता. तसे न झाल्याने बुमरा आणि भारतीय संघ व्यवस्थापनावर काही अंशी टीका झाली.

‘‘बुमराने मालिकेची उत्कृष्ट सुरुवात केली होती. त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात पाच बळी मिळवले होते. त्यानंतर तो दुसऱ्या कसोटीला मुकला. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत तो खेळला. यापैकी एका कसोटीत त्याने पुन्हा डावात पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली होती,’’ असे सचिन म्हणाला.

‘‘लोक आता विविध गोष्टींबाबत चर्चा करत आहेत. बुमरा ज्या सामन्यांत खेळला नाही, तेच सामने भारताने जिंकले असे सातत्याने बोलले जात आहे. मात्र, हा निव्वळ योगायोग आहे. बुमरामधील गुणवत्ता अविश्वसनीय आहे. त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत संघातील आपले महत्त्व वारंवार सिद्ध केले आहे. सध्याच्या घडीच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. त्यामुळे त्याच्याबाबतीत प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही,’’ असेही सचिनने नमूद केले.

सिराजने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली असली, तरी एकंदर कसोटी कारकीर्दीत बुमराचे आकडे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सरस आहेत. सिराजने आतापर्यंत ४१ कसोटींत १२३ बळी मिळवले असून बुमराने त्याच्यापेक्षा केवळ सात कसोटी सामने अधिक खेळताना ९६ अधिक गडी (एकूण ४८ कसोटींत २१९) बाद केले आहेत.

वॉशिंग्टनचे कौतुक

भारतीय संघासाठी बुमराचे महत्त्व अधोरेखित करतानाच सचिनने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचेही विशेष कौतुक केले. ‘‘वॉशिंग्टनला जेव्हाही संधी मिळते, तेव्हा तो संघासाठी योगदान देतो. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पाचव्या दिवशी उपाहारापूर्वी त्याने बेन स्टोक्सला माघारी धाडले. त्यामुळे सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. तसेच अखेरच्या कसोटीत निर्णायक वेळी त्याने ५३ धावा फटकावत भारताच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण भर घातली. त्याआधी चौथ्या कसोटीत खेळपट्टीवर ठाण मांडणे गरजेचे होते, तेव्हा त्याने संयम दाखवला. त्याने आपल्या खेळाच्या सर्व छटा दाखवून दिल्या असून त्याचे कौतुक झालेच पाहिजे,’’ असे सचिनने नमूद केले.

कर्णधार गिलची कामगिरी वाखाणण्याजोगी

कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत शुभमन गिलने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी होती, असे मत सचिनने मांडले. ‘‘कसोटी क्रिकेटमधील सध्याच्या घडीच्या सर्वांत आक्रमक शैलीत खेळणाऱ्या संघाविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत राखणे हे साधेसुधे यश नाही. कर्णधार म्हणून गिल कौतुकास पात्र आहे,’’ असे सचिन म्हणाला.

‘‘काही गोष्टी भारताच्या पक्षात गेल्या असत्या, तर मालिकेचा निकाल कदाचित वेगळा असता. मात्र, क्रिकेटमध्ये ‘जर-तर’ याला स्थान नाही. मैदानावर गिल अतिशय शांत दिसला. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज मोठी भागीदारी रचत असल्यास कर्णधारावर दडपण वाढते. तुम्हाला धावा रोखण्यावर लक्ष केंद्रित करावे लागते. गिलने ते केले.’’

‘‘गिलने संपूर्ण संघाला योग्य पद्धतीने हाताळल्याचे मला जाणवले. काही गोष्टी त्याला वेगळ्या करता आल्या असत्या. याबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र, एकंदरीत कर्णधार म्हणून त्याची पहिली कसोटी मालिका यशस्वी ठरली असे म्हणायला हरकत नाही,’’ असे सचिनने सांगितले.