ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचं त्याला वेड आहे. बॉलिवूडच्या ‘शीला की जवानी’ या प्रसिद्ध गाण्यावर त्याने डान्स केला होता. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपलं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुन याच्या बुट्टाबोम्मा गाण्यावर वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडीस थिरकली. त्यानंतर या दोघांनी अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या ‘नैनु पक्का लोकल’ गाण्यावरही ताल धरला. आता त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार रजनीकांत यांच्यावरील प्रेम दाखवून दिलं आहे.
वॉर्नर गेल्या काही दिवसांपासून रिफेस अॅपचा वापर करून काही बड्या सेलिब्रिटींच्या चेहऱ्याच्या जागी स्वत:चा चेहरा लावलेले व्हिडीओ अपलोड केले आहेत. हॉलिवूडचा ‘रॅम्बो’, क्रिकेटपटू विराट कोहली अशा काही सेलिब्रिटीजचे चेहरे रिप्लेस करून तेथे स्वत:चा चेहरा लावलेले व्हिडीओ त्याने पोस्ट केले होते. तसाच, सुपरस्टार रजनीकांत यांच्या जागी स्वत:चा चेहरा लावलेला एक व्हिडीओ त्याने नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच अपलोड केला. रजनीकांतच्या एका गाण्यावर त्याची वेगवेगळी रूपं दाखवण्यात आली आहेत. त्याच व्हिडीओत रजनीकांतच्या जागी वॉर्नरने स्वत:चा चेहरा पेस्ट केला आहे.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
या व्हिडीओखाली त्याने कॅप्शन लिहीले आहे, “माझ्या अनेक चाहत्यांनी रजनीकांत यांच्यासंबंधीचा व्हिडीओ पोस्ट करण्याची मागणी केली होती. नववर्षाचं निमित्त साधून हा व्हिडीओ”. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. २४ तासांच्या आतच लाखो युजर्सने हा व्हिडीओ लाईक केला आहे. १.८० मिलियन लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे तर २७ हजारांहून अधिक चाहत्यांनी त्यावर कमेंट केली आहे.
