IPL 2023 Promo Shooting: आयपीएल २०२३ या स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरू होत आहे. आगामी हंगामासाठी सर्व १० फ्रँचायझींनी तयारी सुरु केली आहे. त्याच वेळी, ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स देखील तयारीमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी स्टार स्पोर्ट्ससाठी आयपीएल प्रोमो शूट केला आहे, ज्याचे पडद्यामागचे (BTS) फुटेज खूप चर्चेत होते. आता अनुभवी फलंदाज विराट कोहलीचा एक बीटीएस व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल –

कोहली गोंगाटात शूटिंग करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय आणि तो वेगळ्या अंदाजात दिसत आहे. कोहली गर्दीच्या मध्यभागी उभा राहतो आणि जेव्हा खूप आवाज येतो तेव्हा कानाला हात लावतो. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) जर्सीमध्ये दिसत आहे. तेव्हा विराट कोहली ‘जब होगा शोर ऑन, तब होगा गेम ऑन’ म्हणत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर कोहलीचे चाहते त्याच्या लूक आणि स्टाइलचे कौतुक करत आहेत. अनेकांनी कोहलीला क्रिकेटचा पोस्टर बॉय म्हटले आहे.

पहिल्या सत्रापासून कोहली आरसीबीशी जोडला गेला आहे. फ्रँचायझीसह त्याने १५ वर्षे पूर्ण केली आहेत. आयपीएलमधला तो एकमेव खेळाडू आहे, जो एवढा काळ एकाच फ्रँचायझीसाठी खेळला आहे. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेत ६६२४ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे कसोटीतील शतकाचा दुष्काळ संपवल्यामुळे कोहली सध्या चर्चेत आहे.

त्याने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत १८६ धावांची शानदार खेळी केली. कोहलीने तीन वर्षांनंतर कसोटीत शतक झळकावले. त्यामुळे त्याचा कसोटी शतकाचा दुष्काळ अखेर संपुष्टात आला आहे. विराट कोहलीची अवघ्या १४ धावांनी द्विशतक हुकले. दरम्यान विराट कोहलीचे हे कसोटी क्रिकेटमधील २८ वे शतक होते. त्याचबरोर एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७५ वे शतक आहे.

हेही वाचा – WTC Final 2023: भारत की ऑस्ट्रेलिया विजेतेपदाचा सामना कोण जिंकणार? पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केली मोठी भविष्यवाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला –

अहमदाबाद कसोटीत शतक झळकावताच, विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वात कमी डावात ७५ शतके झळकावणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम ५२२ डावांमध्ये केला, तर सचिनने ७५ आंतरराष्ट्रीय शतके करण्यासाठी ५६६ डाव घेतले होते.