वृत्तसंस्था, चेन्नई : भारताच्या विदित गुजराथीला चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत शुक्रवारी अमेरिकेच्या रे रॉबसनकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्याच वेळी स्पर्धेची विजयी सुरुवात करणाऱ्या अग्रमानांकित अर्जुन एरिगेसीला दुसऱ्या फेरीत नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने बरोबरीत रोखले.

चेन्नई स्पर्धेच्या मास्टर्स विभागात दुसऱ्या दिवसअखेरीस जर्मनीचा व्हिन्सेन्ट केमेर आघाडीवर होता. त्याने भारताच्या व्ही. प्रणववर विजय मिळवला. ग्रँडमास्टर रे रॉबसनने दिवसातील सर्वांत अनपेक्षित निकाल नोंदवताना अनुभवी विदितला पराभूत केले. अनिश गिरी आणि निहाल सरीन या भारतीयांमधील लढत बरोबरीत सुटली. तसेच अवॉन्डर लिआंग आणि कार्तिकेयन मुरली यांनाही बरोबरीवर समाधान मानावे लागले.

चॅलेंजर्स विभागात, ग्रँडमास्टर पी. इनियनने चमकदार कामगिरी करताना भारताची आघाडीची बुद्धिबळपटू द्रोणावल्ली हरिकावर मात केली. ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकने विजयी पुनरागमन करताना भारताच्याच लिऑन ल्युक मेन्डोन्काला पराभूत केले. अन्य लढतींत, दिप्तयन आणि प्रणेश, बी. अधिबन आणि आर. वैशाली, तसेच हर्षवर्धन आणि आर्यन यांच्यात बरोबरी झाली.